ICU मध्येच ऑक्सिजन मास्कला लागली आग; रुग्णाच्या मृत्यूनंतर कर्मचारी पळून गेल्याचा कुटुंबियांचा आरोप

Rajasthan News : राजस्थानच्या कोटा मेडिकल कॉलेजच्या न्यू हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन मास्कला आग लागल्याने खळबळ उडाली होती. रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

आकाश नेटके | Updated: Jul 15, 2023, 11:07 AM IST
ICU मध्येच ऑक्सिजन मास्कला लागली आग; रुग्णाच्या मृत्यूनंतर कर्मचारी पळून गेल्याचा कुटुंबियांचा आरोप title=

Rajasthan News : राजस्थानच्या (Rajasthan) कोटा वैद्यकीय महाविद्यालयात एका रुग्णाच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. रुग्णाच्या ऑक्सिजन मास्कला (oxygen mask) आग लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.कोटा येथील मेडिकल कॉलेजच्या न्यू हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. ऑक्सिजन मास्कमधील ठिणगीने आग लागल्यानंतर तो रुग्णाच्या गळ्यातच अडकला होता. या सगळ्या प्रकारानंतर रुग्णालयातील कर्मचारी पळून गेल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबियांच्या आरोपानंतर आता प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

जीव वाचवणाऱ्याच मशिनने रुग्णाचा मृत्यू झाल्याने सगळीकडे या घटनेची चर्चा सुरु आहे. अनंतपुरा येथील रहिवासी वैभव शर्मा हा रुग्णालयाच्या सर्जिकल आयसीयूमध्ये बेडवर होता. त्याला बुधवारी रात्री डायरेक्ट कार्डिओव्हर्शन (डीसी) शॉक देण्यात आला. दरम्यान, ठिणगी पडल्यानंतर ऑक्सिजन मास्कने पेट घेतला. त्यानंतर आग लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. मात्र रुग्णाचा मृत्यू आधीच झाल्याचे डॉक्टर सांगत आहेत.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, वैभवला आतड्यांतील संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला गॅस्ट्रोइंटेस्टाइनल पर्फोरेशन नावाचा आजार होता. या आजारात मोठे आतडे किंवा लहान आतड्यामध्ये छिद्र असते. वैभववर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला आयसीयूमध्ये डायरेक्ट करंट (डीसी) कार्डिओव्हर्शन शॉक दिला जात होता. दरम्यान, त्यांच्या चेहऱ्यावरील ऑक्सिजन मास्कने पेट घेतला. त्यानुसार रुग्णाला डीसी शॉक देण्यापूर्वी त्याला सीपीआर देण्यात आला. मात्र शॉक देताना आग लागल्याने कर्मचाऱ्यांनी वैभवर चादर टाकली. या प्रकारानंतर संपूर्ण आयसीयूमध्ये एकच खळबळ उडाली होती, पण काही वेळातच आग विझवण्यात आली.

"12 जुलै रोजी दुपारी 3 वाजता वैभवची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. रात्री दहाच्या सुमारास त्याला ऑक्सिजन सपोर्ट लावण्यात आले. मात्र वैभवच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती. यामुळे त्याला डीसी कार्डिओव्हर्शन शॉक देण्यात आला. उपचारादरम्यान विजेचा शॉक दिल्यानंतर भावाची प्रकृती बरी होती. मात्र ऑक्सिजन मास्कला अचानक आग लागल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिथून पळ काढला. आगीमुळे वैभवचा जळून मृत्यू झाला," असा आरोप वैभवचा भाऊ गौरवने केला आहे. 

या सर्व प्रकारानंतर वैभवच्या कुटुंबीयांनी सकाळपासून रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच वैभवचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला होता. दुपारी प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर वैभवच्या कुटुंबियांनी तीन मागण्या केल्या होत्या. तिन्ही मागण्यांवर एकमत झाल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून ती 24 तासांत आपला अहवाल सादर करणार असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.