जात काही जात नाही! मुलीने दुसऱ्या जातीत लग्न केलं, आई-वडिलांनी ट्रेन खाली झोकून दिलं

मुलीच्या लग्नाने नैराश्यात असलेल्या आई-वडिलांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. मुलाला नातेवाईकांकडे पाठवून दिलं. त्यानंतर पती-पत्नीने जोधपूर-रतलाम ट्रेनखाली उडी मारत आत्महत्या केली. 

राजीव कासले | Updated: Jul 26, 2023, 06:24 PM IST
जात काही जात नाही! मुलीने दुसऱ्या जातीत लग्न केलं, आई-वडिलांनी ट्रेन खाली झोकून दिलं title=

Crime News : एकवीसव्या शतकातही जातीचं (Cast Issue) मळभ दूर झालेलं नाही. आपल्या समाजात आजही जातपातीचा भेदभाव सुरुच आहे. कधी जातीच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी (Reputation) मुलीची हत्या केली जाते, तर कधी कुटुंबाकडून आत्महत्येसारखं (Suicide) पाऊल उचललं जातं. अशीच एक दुर्देवी घटना पन्हा एकदा समोर आली आहे. मुलीने दुसऱ्या जातीतल्या मुलाबरोबर लग्न केलं. तिच्या कुटुंबियांनी तिला खूप समजावलं. पण मुलगी आपल्या निर्णयावर ठाम होती. तीने दुसऱ्या जातीतल्या मुलाशी लग्न केलं. पण गोष्टीमुळे मुलीचे आई-वडिल प्रचंड नैराश्यात गेले. त्यांनी आपल्या मुलाला नातेवाईकांकडे पाठवून दिलं. त्यानंतर रेल्वेखाली उडी मारत आत्महत्या केली. पोलिसांना या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट (Suicide note) सापडली. ज्यात या संपूर्ण घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. 

राजस्थानमधल्या जोधपूरमधली (Jodhpur) ही घटना आहे. जोधपूरमधल्या पाली इथल्या हाऊसिंग बोर्डात अशोक नावाचे व्यक्ती, पत्नी आणि आपल्या दोन मुलांसहा राहत होते. अशोक यांच्या मुलीचे दुसऱ्या जातीतल्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांना तरुणीच्या कुटुंबियांचा विरोध होता. पण विरोधाला न जुमानता त्यांच्या मुलीने प्रियकराबरोबर लग्न केलं आणि घरातून निघून गेली. हा गोष्टी तिच्या आई-वडिलांच्या मनला प्रचंड लागली. अशोक यांनी आपल्या मुलीची समज काढण्याचा प्रयत्न केला. पण यात ते अपयशी ठरले. मुलगी ऐकत नसल्याने अशोक आणि त्यांच्या पत्नीने पोलिसातही तक्रार केली.

पण पोलिसांसमोरही मुलीने आपण पतीसोबतच राहाणार असल्याचं सांगितलं. मुलगी सज्ञान असल्याने पोलिसांनी पालकांची समजूत काढत मुलीला तिच्या पतीबरोबर राहाण्याची परवानगी दिली. पण मुलीच्या या निर्णयाने अशोकआणि त्याची पत्नी नैराश्यात गेले. अशोक यांना या गोष्टीचा प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यातच दुसऱ्या जातीतल्या मुलाबरोबर लग्न केल्याने समाजात आपली बदनामी होईल या भीतीने ते आणखीनच खचले. 

मुलाला नातेवाईकांकडे पाठवलं
मंगळवारी सकाळी अशोक पत्नी आणि मुलासह घरातून बाहेर पडले. त्यांनी मुलाला जोधपूर इथं राहाणाऱ्या आपल्या नातेवाईकांच्या घरी सोडलं. त्यानंतर अशोक आणि त्यांची पत्नी जोधपूर रोड जवळच्या घुमटी इथं गेले. या ठिकाणावरुन रेल्वे मार्ग जातो. या ठिकाणी त्यांनी जोधपूर-रतलाम ट्रेनखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. 

घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थ्ळी पोहोचत अशोक आणि त्यांच्या पत्नीचे मृतदेह ताब्यात घेतले. या संपूर्ण घटनेने जोधपूर-रतलाम ट्रेन एक तास त्याच ठिकाणी उभो होती. दरम्यान, पोलिसांनी मृतदेहाशेजारी सुसायड नोट सापडली आहे. यात त्यांनी आत्महत्येचं कारण लिहिलं आहे. 'आमच्या मुलीने दुसऱ्या जातीतल्या मुलाशी प्रेमविवाह केला. या गोष्टीने मी, माझी पत्नी आणि मुलगा खुपच दु:खी आहोत. मुलीच्या अशा कृत्यामुळे मी आणि पत्नी आत्महत्येचं पाऊल उचलत आहोत. आमचा मुलगा गौरव खूप चांगला आहे. देव त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करोत, काका-काकीने त्याची देखभाल करावी, तसंच पोलिसांना विनंती आहे की त्याला त्रास देऊ नये' असं या सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं होतं.