सखल भागातील रेल्वे रूळांची उंची वाढवण्याचा रेल्वेचा निर्णय

मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर दरवर्षी पाणी साचतं.

Updated: Jul 30, 2019, 11:45 AM IST
सखल भागातील रेल्वे रूळांची उंची वाढवण्याचा रेल्वेचा निर्णय title=

बदलापूर : पूरस्थितीमुळे बदलापूर - वांगणी दरम्यान मदालक्ष्मी एक्सप्रेस तब्बल १७ तास अडकली होती. त्यानंतर आता रेल्वेने बदलापूर - वांगणी दरम्यान जीथे रेल्वे रूळ पाण्याखाली जातात तिथे रेल्वे रूळांची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अशा ठिकाणी गस्ती पथकं नेमण्यात येणार आहेत. २६ जुलैच्या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीची पुरती दैना उडाली होती. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तशा सूचना अभियांत्रिकी विभागाला देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस सध्या पाहायला मिळतो आहे. दरवर्षी मुसळधार पावसामुळे रेल्वेचे रुळ पाण्याखाली जातात. मुंबईत असे अनेक ठिकाणं आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचतं. ज्यामुळे रेल्वे रुळ पाण्याखाली जातात आणि वाहतूक बंद होते. कुर्ला-सायन, मानखुर्द-चुनाभट्टी दरम्यान रुळांवर पाणी साचतं. सखल भाग असल्यामुळे येथे पाणी साचण्याचं प्रमाण मोठं आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक यामुळे अनेकदा उशिराने सुरु असते.

मध्य रेल्वेवर अशी अनेक ठिकाणं आहे जेथे पाणी साचतं. त्यामुळे आता अशा ठिकाणी रुळांची उंची वाढवण्याचा निर्णय़ रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.