RRB Recruitment 2019: रेल्वेमध्ये एकूण चार लाख पदांची भरती

दीड लाख पदांच्या भरतीचं काम सुरु 

Updated: Jan 23, 2019, 08:27 PM IST
RRB Recruitment 2019: रेल्वेमध्ये एकूण चार लाख पदांची भरती title=

नवी दिल्ली: बुधवारी रेल्वे मंत्र्यांकडून करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या घोषणांमध्ये आगामी भरतीविषयीसुद्धा माहिती देण्यात आली. माध्यमांना संबोधत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याविषयीची माहिती दिली. रेल्वेमध्ये येत्या काळात जवळपास सव्वा दोन ते अडीच लाख पदांसाठी नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध करण्यात येणार असून, दीड लाख पदांच्या भरतीचं काम सुरु असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे एका अर्थी रेल्वेकडून जवळपास ४ लाख पदांची नव्याने भरती करण्यात येणार असल्याची बाब आता सर्वांचं लक्ष वेधत आहे. 

'सव्वा दोन ते अडीच लाख लोकांना आणखी संधी मिळणार असून, दी़ड लाख पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे एक प्रकारे चार लाख जणांना नोकरीच्या नव्या संघी  एकट्या रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात येत आहेत. दीड लाख पदांच्या भरतीचं काम हे येत्या दोन- अडीच महिन्यांमध्ये पूर्णत्वास जाईल, असं पियुष गोयल म्हणाल्याचं वृत्त एएनाय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं आहे. 

रेल्वे मंत्रालयातील अधिकृत सुत्रांचा हवाला देत इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार येत्या काळात होणाऱ्या भरतीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी १० टक्के राखीव कोटा असल्याचंही म्हटलं जात आहे. 

कधी प्रसिद्ध होणार जाहीरात? 

सूत्रांच्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मे अशा दोन महिन्यांमध्ये भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार असून, ती दोन टप्प्यांमध्ये प्रसिद्ध होणार आहे. २०२१ पर्यंत संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस आहे. मुख्य म्हणजे मागासवर्गीय आरक्षितांसोबतच आर्थिकदृष्ट्या दुर्बलांनाही या भरती प्रक्रियेचा फायदा होणार आहे. मागील वर्षी रेल्वे मंत्रालयाकडून १.२ लाख पदांच्या भरतीसाठीची जाहीरात करण्यात आली होती. Group C, Group D या दोन गटांतील पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आली होती.