निर्मला सितारामन यांच्या दाव्यात विसंगती; भाजप पुन्हा अडचणीत

राहुल गांधी यांनी सरकारला अक्षरश: धारेवर धरले आहे.

Updated: Jan 7, 2019, 03:01 PM IST
निर्मला सितारामन यांच्या दाव्यात विसंगती; भाजप पुन्हा अडचणीत title=

नवी दिल्ली: राफेल करारातील आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा काही केल्या भाजपचा पिच्छा सोडायला तयार नाही. राफेलप्रकरणी संसदेत शुक्रवारी निर्मला सितारामन यांनी तांत्रिक तपशील सादर करत काँग्रेसच्या आरोपांचा जोरदार प्रतिवाद केला होता. यावेळी त्यांनी HAL कंपनीशी केंद्र सरकारने १ लाख कोटी रुपयांच्या कामासाठी करार झाल्याचा दावा केला होता. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या माहितीमध्ये विसंगती असल्याचे सांगत भाजपला पुन्हा कोंडीत पकडले आहे. निर्मला सितारामन यांच्या संसदेतील भाषणानंतर काहीवेळातच HAL कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे वेतन द्यायला पैसे नसल्याची माहिती समोर आली होती. यानंतर निर्मला सितारामन यांनी सोमवारी HAL कंपनीला सरकारने २६,५७० कोटी रूपयेच दिल्याचा नवा खुलासा केला. त्यामुळे सितारामन यांनी अगोदर दिलेल्या माहितीमधील विसंगती उघड झाली. यावरून राहुल गांधी यांनी लगेचच भाजपला घेरले. निर्मला सितारामन यांनी संसदेत खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला. यावर निर्मला सितारामन यांनी सारवासारव करताना HAL कंपनीसंदर्भात करण्यात आलेले आरोप अयोग्य आणि दिशाभूल करणारे असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने HAL कंपनीला आतापर्यंत २६,५७० कोटी रुपये दिले आहेत. तसेच ७३ हजार कोटी रुपयांचे करार लवकरच होतील, असे सितारामन यांनी म्हटले. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सरकारला अक्षरश: धारेवर धरले आहे. जेव्हा तुम्ही एक खोटे बोलता तेव्हा ते लपवण्यासाठी तुम्हाला ते झाकण्यासाठी आणखी खोटे बोलावे लागते. आतापर्यंत ‘एचएएल’ या सरकारी कंपनीला १ लाख कोटी रुपयांची कामे दिल्याचे सीतारामन यांनी म्हटले असले तरी त्यातील एक रुपयाचे काम त्यांना मिळालेले नाही, असा आरोप राहुल यांनी केला. आपल्या उद्योजकमित्रांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एचएएल’चा पैसा उधळला. त्यामुळे ही कंपनी कमकुवत झाली असून, त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पैसे नसल्याने कोटय़वधींचे कर्ज घेण्याची वेळ आली, असे राहुल गांधी यांनी सांगितले.