मोदी बॉक्सिंगच्या रिंगणात उतरले पण प्रशिक्षक असणाऱ्या अडवाणींनाच मारले- राहुल गांधी

 गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने रिंगणात नरेंद्र मोदी नावाचा बॉक्सर उतरवला होता.

Updated: May 6, 2019, 03:53 PM IST
मोदी बॉक्सिंगच्या रिंगणात उतरले पण प्रशिक्षक असणाऱ्या अडवाणींनाच मारले- राहुल गांधी title=

चंदीगढ: भाजपने रिंगणात उतरवलेल्या नरेंद्र मोदींनी प्रतिस्पर्धी सोडून स्वत:च्याच पक्षातील नेत्यांना मारले, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला. ते सोमवारी हरियाणा भिवानी येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने रिंगणात नरेंद्र मोदी नावाचा बॉक्सर उतरवला होता. रिंगणात उतरल्यानंतर हा बॉक्सर बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि भ्रष्टाचार अशा समस्यांवर प्रहार करेल, असे सर्वांना वाटत होते. त्यामुळे भाजपकडून या बॉक्सरचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र, रिंगणात उतरल्यानंतर मोदींनी प्रतिस्पर्धी सोडून सर्वप्रथम त्यांचे प्रशिक्षणक असणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांना जोरदार ठोसा लगावला. यानंतर ते स्वत:च्या टीममधील नितीन गडकरी आणि अरूण जेटली यांच्यामागे धावत सुटले. हे सर्व बघून लोक चक्रावून गेले. मात्र, मोदी एवढ्यावरच थांबले नाहीत. ते रिंगणातून बाहेर पडले आणि सामान्य जनतेला मारत सुटले. त्यांनी नोटाबंदी आणि जीएसटी लागू करून सामान्य जनता आणि व्यापाऱ्यांना ठोसा लगावला, असे राहुल गांधी यांनी म्हटले. 

तसेच नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतीय लष्करासंदर्भात करण्यात येणाऱ्या राजकारणावर त्यांनी टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांनी यासाठी भिवानीच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. मी एकवेळ प्राण देईन पण अशा मुद्द्यांवरून राजकारण करणार नाही, असेही राहुल यांनी सांगितले.