मुंबई : राहुल गांधी मुंबईतील शिवडी न्यायालयात आले असताना काँग्रेस कार्यकर्तेदेखील मोठ्या प्रमाणात जमले होते. अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच कार्यकर्त्यांसमोर आले होते. राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. ही कार्यकर्त्यांची भावना योग्यच असल्याचं मत काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी व्यक्त केले. राहुल गांधींना मुद्दामहून त्रास देण्यासाठी अश्या प्रकारे न्यायालयात याचिका दाखल केल्या जात असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.
भर पावसात आपल्याला पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांचे राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून आभार मानलेत. 'तुमचं प्रेम आणि पाठिंबा हीच माझी शक्ती आहे' असंदेखील राहुल गांधी यांनी म्हटलंय.
Thank you to everyone who came out in the pouring rain today in Mumbai, to support me in my battle against the forces of injustice, hatred & violence,
Your love & support is my greatest strength.
Jai Hind pic.twitter.com/Mb4jnWbfkg— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 4, 2019
दरम्यान, राहुल गांधींना शिवडी न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर संघाविरोधात ट्विट केल्यानंतर राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. धृतमान जोशी यांनी शिवडीच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी राहुल गांधी आणि सीताराम येचुरी यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावली झाली. त्यावेळी राहुल गांधी यांनी 'मी दोषी नाही', असं न्यायालयासमोर सांगितलं.
शिवडी न्यायालयानं १५ हजारांच्या जातमुचलक्यावर राहुल गांधी यांना जामीन मंजूर केलाय. याप्रकरणी पुढील सुनावणी २१ जुलै रोजी होणारेय. २१ जुलैच्या सुनावणीत याचिकाकर्ते न्यायालयात पुरावे सादर करणारेत. मात्र २१ तारखेला राहुल गांधींना अनुपस्थित राहण्याची मुभा मिळेल असं राहुल गांधी यांच्या वकिलांनी म्हटलंय.
गेल्या पाच वर्षांत लढाई लढलो त्यापेक्षा आणखी जोशात लढाई लढणार असल्याचं यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. तसंच न्यायालयातील लढाई विचारांची आहे ती लढणारच अशी प्रतिक्रियाही त्यांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दिलीय.