नवी दिल्ली: सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने २२ आरोपींची निर्दोष सुटका केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला लक्ष्य केले. त्यांनी नो 'नव किल्ड देम, दे जस्ट डाईड', अशा शीर्षकाखाली संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्यांची यादी दिली आहे. यामध्ये सोहराबुद्दीन शेख खटल्यासाठी न्यायाधीश म्हणून काम करणाऱ्या न्यायमूर्ती बी.एच. लोया यांचाही समावेश आहे. हा खटला सुरु असताना न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.
सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात न्यायालयाने पुराव्यांअभावी कोर्टाने सर्व २२ आरोपींची निर्दोष सुटका केली होती. या प्रकरणात गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २०१४ मध्ये त्यांना क्लीन चीट दिली होती. कोर्टाने या प्रकरणात एकूण २१० साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या होत्या. पण त्यापैकी बहुतेक साक्षीदारांनी आपली आधीची साक्ष फिरवल्याने निकालावर परिणाम झाला.
NO ONE KILLED...
Haren Pandya.
Tulsiram Prajapati.
Justice Loya.
Prakash Thombre.
Shrikant Khandalkar.
Kauser Bi.
Sohrabuddin Shiekh.
THEY JUST DIED.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 22, 2018
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांशी संबंध असल्यावरून सोहराबुद्दीन शेख त्यांची पत्नी आणि सहकारी या सर्वांना २००५ साली गुजरात पोलिसांनी अटक केली होती. २२ आणि २३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार २६ नोव्हेंबर २००५ रोजी अहमदाबादजवळ बनावट चकमकीत सोहराबुद्दीन शेखची हत्या करण्यात आली. त्यानंतर तीन दिवसांनी त्याच्या पत्नीलाही मारण्यात आले आणि त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. त्यानंतर एक वर्षाने २७ डिसेंबर २००६ रोजी गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर चापरी येथे तुलसीराम प्रजापतीची बनावट चकमकीत हत्या करण्यात आली, असे सीबीआयने म्हटले आहे. या प्रकरणातील २१० साक्षीदारांपैकी ९२ जणांनी आपली साक्ष फिरवली होती. ही घटना १२ वर्षांपूर्वीची असल्याने अनेकांना घटनेचा क्रमही आता लक्षात नाही. या सर्वाचा विचार करून कोर्टाने निकाल दिला असल्याचे वकिलांनी सांगितले होते.