नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे पुन्हा एकदा अडचणीत येणार अशी चिन्हं दिसत आहेत. भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख करणे त्यांना महागात पडू शकते. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यासंदर्भातील लेखी तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. लोकसभा अध्यक्ष याप्रकरणी विशेषाधिकार समिती नियुक्त करु शकतात अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. विशेषाधिकारांच्या पायमल्लीचा (breach of privilege) ची तक्रार राहुल गांधी यांच्या विरोधात करण्यात आला आहे. नियुक्त केलेली समिती या निर्णयाचा विचार करुन पुढचा निर्णय घेईल. आवश्यकता वाटल्यास राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलवण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे.
'दहशतवादी प्रज्ञा सिंहने दहशतवादी गोडसेला देशभक्त म्हटले' असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले होते. भारतीय संसदेतील इतिहासाचा एक दु:खद दिवस असेही ते पुढे म्हणाले होते. यानंतर लोकसभेत गोंधळ झाला होता. प्रज्ञा ठाकूर यांनी गोडसे प्रकरणी लोकसभेची माफी मागितली. त्यानंर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. तसेच याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी इतर खासदारांनी केली.
राहुल गांधी यांनी याप्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात साध्वी प्रज्ञा यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणारे माजी एटीएस प्रमुख दिवंगत हेमंत करकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळेच झाला. मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल, अशा शाप दिला होता. तो अखेर खरा ठरला, असे वक्तव्य साध्वी यांनी म्हटले होते. नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि कायम राहतील. त्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या लोकांनी एकदा आत्मपरीक्षण करावे. या निवडणुकीत जनता अशा लोकांना धडा शिकवेल, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले होते.