मुंबई : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे राहुल गांधी यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला दिसत आहे. हे श्रेय राहुल गांधींनाच मिळायला हवं. या निकालांमुळे राहुल गांधी यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळे आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर देखील याचे परिणाम होतील अशी चर्चा देखील सुरु झाली आहे.
लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत सक्षम नेतृत्व म्हणून राहुल गांधींची प्रतिमा आणखी बळकट झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष झाले होते. वर्षभरात त्यांच्या नेतृत्वात मिळालेलं हे सर्वात मोठं यश आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या राज्यात काँग्रेसने मोठं भगदाड पाडलं आहे. यामुळे राहुल गांधी यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला दिसतो आहे. निकालानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान देखील त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास दिसत होता.
राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचं देखील अभिनंदन केलं. त्यांनी म्हटलं की, आतापर्यंत ज्या मुख्यमंत्र्यांनी काम केलं त्यांचं देखील अभिनंदन. यापुढे आम्ही हे काम पुढे घेऊन जावू असं देखील त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी पक्षात देखील अनेक बदल केले आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींनी राज्यांतल्या नेतृत्वांमध्ये बदल केले होते. राफेल आणि इतर मुद्द्यांवर राहुल गांधींनी मोदींना थेट आव्हान दिलं. राहुल गांधी यांनी इतर विरोधकांना देखील सोबत घेऊन भाजप विरोधात वातावरण तयार करण्यात सुरुवात केली.