नवी दिल्ली: राफेल विमान खरेदी व्यवहारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधींनी मोदींना 'कमांडर इन थिफ' म्हणून संबोधले आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती राफेल कराराची माहिती देत असल्याचे दिसत आहे. राफेल करारासाठी भारत सरकारने अंबानीचं नाव सूचवलं होते. त्यामुळे माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता, असे माजी राष्ट्रपती फ्रास्वा ओलांद यांनी सांगितल्याचे हा व्यक्ती सांगताना दिसत आहे. या व्हीडिओला राहुल गांधींनी 'कमांडर इन थिफ बाबतचं कटू सत्य' असे कॅप्शन दिले आहे.
यापूर्वीही राहुल गांधी यांनी फ्रास्वा ओलांद यांच्या वक्तव्यानंतर देशाचा चौकीदार चोर असल्याचे म्हटले होते. नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांनी भारतीय लष्करावर १ लाख ३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक केल्याची टीकाही राहुल यांनी केली होती.
The sad truth about India's Commander in Thief. pic.twitter.com/USrxqlJTWe
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 24, 2018