'हाऊज द जॉब'; बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा मोदींना सणसणीत टोला

देशातील बेरोजगारीने गेल्या ४५ वर्षातील उच्चांक गाठला आहे.

Updated: Jan 31, 2019, 04:52 PM IST
'हाऊज द जॉब'; बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा मोदींना सणसणीत टोला title=

नवी दिल्ली: देशातील बेरोजगारीने उच्चांक गाठल्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगले. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या (एनएसएसओ) अहवालातील गुप्त माहिती उघड झाल्यानंतर हा सर्व प्रकार घडला. या अहवालानुसार देशातील बेरोजगारीने गेल्या ४५ वर्षातील उच्चांक गाठला आहे. जुलै २०१७ ते जून २०१८ या काळात झालेल्या या सर्वेक्षणानुसार बेरोजगारीचा दर ६.१ टक्के इतका नोंदवण्यात आला. १९७२-७३ पहिल्यांदाच बेरोजगारीचा दर इतक्या उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचल्याने अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

साहजिकच या माहितीने विरोधकांच्या हातात आयते कोलीत दिले. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सणसणीत टोला लगावला. सरकारने प्रत्येकवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता पाच वर्षांनंतरची परिस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणावी लागेल. बेरोजगारीने ४५ वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. ट्विटरवरील या संदेशात राहुल यांनी NoMo Jobs, #HowsTheJobs हे टॅग वापरून मोदी सरकारची खिल्ली उडविली आहे. राहुल गांधींच्या या ट्विटनंतर ट्विटरवर #HowsTheJobs हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता. 

मात्र, भाजपच्या नेत्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. ही खोटी बातमी असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. उलट गेल्या १५ महिन्यांत रोजगाराचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. फक्त एक रिकामटेकडा आणि कोणतीही जबाबदारी धड पार पाडू न शकलेला माणूस खोट्या बातम्या पसरवत असल्याचा पलटवार भाजपकडून राहुल गांधींवर करण्यात आला.