मुलायमसिंह यादवांच्या 'त्या' वक्तव्यावर राहुल गांधी व शरद पवार म्हणतात....

नरेंद्र मोदी यांचे पितळ अगोदरच उघडे पडले आहे.

Updated: Feb 13, 2019, 06:31 PM IST
मुलायमसिंह यादवांच्या 'त्या' वक्तव्यावर राहुल गांधी व शरद पवार म्हणतात.... title=

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत, या मुलायमसिंह यादव यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यानंतर लगेचच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुलायमसिंह यांच्या विधानाशी आपण सहमत नसल्याचे स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी म्हटले की, मी मुलायमसिंह यांच्या वक्तव्याशी असमहत आहे. मात्र, राजकारणात मुलायमसिंह यांचे स्वत:चे असे स्थान आहे आणि त्याचा मला आदर आहे, असे सांगत राहुल यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले. तर शरद पवार यांनी तर शरद पवार यांनी मुलायमसिंह यांच्या वक्तव्याला फारशी किंमत देण्याची गरज नसल्याचे सांगितले. मुलायमसिंह यादव आमच्यासाठी प्राधान्याचा मुद्दा नाहीत. नरेंद्र मोदी यांचे पितळ अगोदरच उघडे पडले आहे. लाज झाकायला त्यांच्या अंगावर कोणतेही कपडे शिल्लक राहिलेले नाहीत, असे पवारांनी 'इंडिया टुडे' या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

१६व्या लोकसभेतील शेवटच्या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी मुलायमसिंह यादव बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आम्हाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे तुम्हीच पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हा. पंतप्रधानांनी सर्वांसोबत मिळून मिसळून काम केले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे. जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्याकडे काही काम घेऊन आलो तेव्हा तुम्ही तत्काळ आदेश देऊन ते काम करून घेतले. या कार्यतत्परतेचा मी आदर करतो. माझी एवढीच इच्छा आहे की, आगामी निवडणुकीत सदनातील सर्व सदस्य पुन्हा निवडून येवोत आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होवोत, असे मुलायमसिंह यादव यांनी म्हटले. साहजिकच त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकीकडे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेशात युती करून मोदी सरकारविरोधात जोरदार आघाडी उघडली असताना मुलायमसिंह यांनी असे वक्तव्य का केले, याचे कोडे अनेकांना पडले आहे.