Bank Alert: 'या' बँकेत तुमचं खातं असेल तर सावधान! बंद होऊ शकतं अकाऊंट

पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांना चेतावणी दिली असून अलर्ट केलं आहे. ज्या खात्यांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून व्यवहार झालेला नाही, ती तात्काळ सक्रीय करण्यास सांगण्यात आलं आहे. 30 जूननंतर ही खाती बंद करण्यात येणार आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jun 18, 2024, 07:10 PM IST
Bank Alert: 'या' बँकेत तुमचं खातं असेल तर सावधान! बंद होऊ शकतं अकाऊंट title=

पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासठी महत्त्वाची आहे. पीएनबीकडून त्या ग्राहक किंवा खातेधारकांना अलर्ट देण्यात आला आहे ज्यांच्या खात्यात गेल्या 3 वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही आणि खात्यातील बॅलेन्स शून्य आहे. अशी खाती 30 जून 2024 पासून बंद केली जातील. त्यामुळे जर तुमचं पीएनबीमध्ये खातं असेल आणि मागील 3 वर्षांपासून त्याचा वापर होत नसेल तर डेडलाईन संपायच्या आधी अपडेट करुन घ्या. बँकेने नेमकं काय सांगितलं आहे ते जाणून घ्या. 

PNB ने एक्सवर पोस्ट शेअर करत अलर्ट दिला आहे. यात त्यांनी सांगितंल आहे की, अनेक खात्यांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून खातेदारांकडून कोणताही व्यवहार झालेला नसून यात काही बॅलेन्सही नाही आहे. अशात या खात्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी काही पावलं उचलण्यात आली असून संबंधित खाती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी बँकेकडून खातेदारांना 1 मे 2024, 16 मे 2024, 24 मे 2024 आणि 1 जून 2024 रोजी वेबसाईट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आधीच नोटीस जारी करण्यात आली होती. खातेदारांना असुविधा टाळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत 30 जूनपर्यंत आपलं खातं सक्रीय करावं लागणार आहे. 

ही खाती बंद केली जाणार नाहीत

पंजाब नॅशनल बँकेने स्पष्ट केलं आहे की, 30 जून 2024 नंतर निष्क्रिय असणारी सर्व खाती बंद केली जाणार आहेत. दरम्यान जी खाती डीमेट खात्यांशी लिंक असतील ती बंद केली जाणार नाहीत. तसंच 25 वर्षांपेक्षी कमी वयाचे खातेदार असणारे विद्यार्थी, अल्पवयीन मुलांची खाती, SSY/PMJJBY/PMSBY/APY सारख्या योजनांसाठी सुरु करण्यात आलेली खाती सस्पेंड केली जाणार नाहीत. 

ग्राहकांना सुविधा देताना बँकेने म्हटलं आहे की, जर तुम्हाला तुमच्या खात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल किंवा कोणतीही मदत घ्यायची असेल तर तुम्ही थेट तुमच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधू शकता. पीएनबीने सांगितल्यानुसार, खातेधारकाने त्याच्या खात्याच्या केवायसीशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे संबंधित शाखेत जमा केल्याशिवाय अशी खाती पुन्हा सक्रिय केली जाऊ शकत नाहीत. म्हणजेच, जर तुम्हाला तुमचे खाते सक्रिय ठेवायचे असेल तर बँकेच्या शाखेत जा आणि लगेच केवायसी करा.