नवी दिल्ली : जागतिक पातळीवर पाकिस्तानची गळचेपी करण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. आता पाकिस्तानला जागतिक पातळीवर काळ्या यादीत टाकण्यासाठी भारताने कागदपत्र जुळवाजुळव सुरू केली आहे. पाकिस्तानचा विशेष राष्ट्राचा दर्जा काढून टाकण्यात आला आहे. पाकिस्तानचा काळ्या यादीत टाकण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. पाकचा समावेश काळ्या यादीत झाल्यास आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, एडीबी, युरोपीय युनियन यांच्याकडून कर्ज पुरवठा होण्यास प्रचंड अडचण निर्माण होणार आहे. पाकिस्तान राखाडी यादीत असून याआधी उत्तर कोरिया आणि इराणला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. पाकिस्तानची कोंडी करण्याचा एकही मार्ग भारत सोडणार नाही आहे. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम न देण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. क्रिकेट विश्वातही याचे पडसाद पाहायला मिळाले आहेत.
मुंबईतील जुन्या क्रिकेट क्लबपैक एक असलेल्या क्रिकेट क्लब ऑफ इडियानं क्लबच्या राऊंड रुममध्ये लावलेला क्रिकेटपटू इम्रान खान यांचं छायाचित्र काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पुलवामा इथे झालेल्या पाकिस्तान परस्कृत दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सीसीआयने हा निर्णय घेतला आहे. इम्रान खानच्या यांच्या छायाचित्राच्या ठिकाणी आता क्रिकेटपटू विनोद मंकड यांचे छायाचित्र लावण्यात येणार आहे.
इम्रान खान क्रिकेटपटू म्हणून जरी मोठे असले तरी ते सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान असून निषेध म्हणून इम्रान खान यांचे छायाचित्र हटवण्याचा निर्णय क्रिकेट क्लब ऑफ इंडियानं घेतला आहे. जगभरातील महत्त्वाच्या देशांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध केला. पण पाकिस्तानातून अशाप्रकारचा कोणता निषेध नोंदवण्यात आला नाही. याऊलट भारताकडे कोणतेही पुरावे नसताना पाकिस्तानला टार्गेट केले जाते असे आरोप पाकतर्फे करण्यात आले. यापुढे पाकिस्तानशी देवाणघेवाणीवर कडक निर्बंध येणार आहेत.
दहशतवादाच्या आर्थिक रसदीवर निर्बंध आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडे पाकिस्तानच्या काळ्या यादीची कागदपत्रे सुपूर्द केली जाणार आहेत. जैश ए मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांना पाकिस्तानने थारा दिल्याचा पुरावा सादर केला जाईल. त्याचबरोबर जैश आणि इतर संघटनांना कशी पाकिस्तानतर्फे सर्व प्रकारची मदत केली जात आहे याचे पुरावे देण्यात येतील.