नवी दिल्ली : पुलवामा येथे भारतीय लष्करी ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 हून अधिक जवान शहीद झाले. देशभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया ये आहेत. अनेक देशांनीही घटनेचा निषेध केला. केंद्रीय मंत्रीमंडळाने यासाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याची जोरदार तयारी केली आहे. पाकिस्तानची राजनैतिक गळचेपी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. पाकिस्तानचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्यात येईल असे अरुण जेटली यांनी सांगितले. पण नेहमीप्रमाणे पाकिस्तानचा 'पालथ्या घड्यावर पाणी' असाच प्रकार पाहायला मिळतोय. भारत विनाकारण प्रत्येक गोष्टीत पाकिस्तानला जबाबदार धरत असल्याचे पाक म्हणत आहेत. पाकचा मित्र राष्ट्र असलेल्या चीनही यामध्ये त्याला साथ देताना दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न भारत करणार आहे. तसेच संयुक्त राष्ट्राने जैश-ए-मोहम्मद प्रमुख सरगना मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करावे असे भारताने अपील केले. पण याला चीनने विरोध केला आहे. चीनने भारताच्या अपीलचे समर्थन करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आगामी काळात चीन आणि भारताचे संबंधही आणखी बिघडलेले पाहायला मिळतील.
या हल्ल्यानंतर देशात आक्रोश आहे ते मी समजू शकतो. आमच्या सुरक्षा बऴांना पू्र्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे. आम्हाला आमच्या लष्करावर पूर्ण विश्वास आहे. दहशतवाद्याने खूप मोठी चूक केली आहे आणि त्यांना याचे उत्तर मिळेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. काश्मिर घाटीत शांतता कायम राहावी यासाठी महत्त्वाची पाऊले उचलली जातील असेही जेटली यांनी सांगितले.
१. पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा भारताने काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. १९९६ पासून पाकिस्तानला भारताकडून व्यापारात सूट मिळत होती ती सूट आता बंद होणार आहे.
२. परराष्ट्र मंत्रालय आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी सगळ्या देशांसोबत चर्चा करणार आहे. जगासमोर पाकिस्तानला खरा चेहरा आणण्यासाठी भारत पाऊल उचलणार आहे.
३. २९८६ मध्ये भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाची परिभाषा बदलण्याचा प्रस्ताव दिला होता. आता हा प्रस्ताव पास करण्यासाठी आणखी प्रयत्न केला जाणार आहे. हा प्रस्ताव पास करण्यासाठी इतर देशांवर दबाव टाकला जाणार आहे.
४. गृहमंत्री राजनाथ सिंह शनिवारी सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत राजनाथ सिंह पुलवामा हल्ल्याबाबत सर्व पक्षांसोबत विस्ताराने चर्चा करणार आहेत.
५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईसाठी भारतीय जवानांना स्वातंत्र्य दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली आहे. आम्ही जवानांना खुली सूट दिली आहे.