पंतप्रधान मोदींनी विचारले, तुमचा मुलगा PUBG खेळतो का?

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन गेममुळे त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे.

Updated: Jan 29, 2019, 04:23 PM IST
पंतप्रधान मोदींनी विचारले, तुमचा मुलगा PUBG खेळतो का? title=

नवी दिल्ली: सध्याच्या तरुणाईमध्ये PUBG हा ऑनलाईन गेम तुफान लोकप्रिय आहे. अनेक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी या गेमच्या आहारी गेले आहेत. यामुळे साहजिकच मुलांचे आई-वडील चिंतेत आहेत. अशाच एका आईने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच आपली समस्या मांडली. दिल्लीत मंगळवारी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात एका आईने पंतप्रधान मोदींसमोर आपली समस्या मांडली. तिने म्हटले की, माझा मुलगा अभ्यासात हुशार होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन गेममुळे त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. मी त्याला अनेकदा सांगून पाहिले. मात्र, त्याचा फारसा फरक पडलेला नाही. तेव्हा तुम्हीच मला काहीतरी उपाय सांगा, असे या आईने विचारले. 

तेव्हा मोदींनी तुमचा मुलगा PUBG खेळतो का, असा प्रतिप्रश्न महिलेला विचारला. त्यांच्या हजरजबाबीपणामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, PUBG गेमकडे केवळ एक समस्या म्हणून नव्हे तर नवा पर्याय म्हणूनही पाहावे, असे मोदींनी म्हटले. तुमचा मुलगा मोबाइलवर गेम खेळत असेल तर त्याला याच मोबाइलद्वारे माहिती मिळवता येते हे पटवून द्यावे. एखाद्यावेळी त्याला नागालँडमधील तांदळाविषयी इंटरनेटवर माहिती शोधायला सांगावी. यामुळे मोबाइलवर चांगल्या गोष्टींचीही माहिती मिळते हे त्याला कळेल. पुढे जाऊन हेच तंत्रज्ञान तुम्हाला आणि मुलाला जोडेल, असे मोदी यांनी सांगितले.