बालाकोट हल्ल्याचेही पुरावे योग्यवेळी देऊ - भारतीय हवाई दल

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान हद्दीद घुसून बालाकोट येथील दहशतवादी अड्ड्यावर हल्ला चढवला. या हल्ल्याचेही पुरावे योग्यवेळी देऊ, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.  

Updated: Feb 28, 2019, 11:03 PM IST
बालाकोट हल्ल्याचेही पुरावे योग्यवेळी देऊ - भारतीय हवाई दल title=

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान हद्दीद घुसून बालाकोट येथील दहशतवादी अड्ड्यावर हल्ला चढवला. ३५० दहशवादी मारण्यात आले आहे, अशी माहिती भारताकडून देण्यात आली आहे. या कारवाईनंतर पाकिस्तान बिथरला. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसखोरी करत भारतीय लष्करी ठाण्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा भारताकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. पाकिस्तानी विमानांनी वापरलेल्या क्षेपणास्त्राचा तुकडा माध्यमांसमोर सादर करण्यात आला. त्याचवेळी बालाकोट हल्ल्याचेही पुरावे योग्यवेळी देऊ, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

पाकिस्तानने भारतावर क्षेपणास्त्रहल्ला केल्याचे पुरावे आज भारतीय सैन्याकडून सादर करण्यात आले. पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांनी भारतीय हद्दीत डागलेल्या अॅब्रॅम या क्षेपणास्त्राचा तुकडाच भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर सादर केला. पाकिस्ताननं भारतीय हद्दीत शस्त्रांचा वापर केला नसल्याचा दावा केला होता. पाकिस्तानचा हा खोटारडेपणा भारताने समोर आणलाय. भारतीय वायुदलानं बालाकोटमध्ये जैशचा दहशतवादी अड्डा उद्धवस्त केल्याचे पुरावे भारताजवळ आहेत. सरकार योग्यवेळी ते जाहीर करेल, असेही वायुदलाच्यावतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

आता जे झालं तो केवळ पायलट प्रोजेक्ट होता. खरा प्रयोग तर अजून करायचा आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानबाबत काय करणार आहे, याचे संकेत दिलेत. आज विज्ञान दिनानिमित्त त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी वैज्ञानिक प्रयोगांचा धागा पकडत सध्या देशात जे सुरू आहे, तो केवळ प्रयोग असल्याचं सूचक विधान केले. दरम्यान, जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या बलाढ्य देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मांडला. तर पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदवर कारवाई करावी, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगामार्फत केली. त्यामुळे पाकिस्तानची चहुबाजुंनी कोंडी व्हायला सुरुवात झाली. अर्थात, संयुक्त राष्ट्रातल्या या प्रस्तावाला चीनकडून पुन्हा खोडा घातला जाण्याची शक्यता आहे. याआधीही चीननं २०१६ आणि २०१७ साली या संदर्भातल्या प्रस्तावाबाबत नकाराधिकार वापरला होता. मात्र या नव्यानं दाखल झालेल्या प्रस्तावाबाबत चीननं सध्या तरी मौन बाळगले.