नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन आणि विकास (इस्रो) संस्थेने 'मिशन शक्ती' यशस्वी केल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या तोंडावर स्वत: या कामगिरीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सहसचिव प्रियंका गांधी यांनीदेखील अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांनाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे. त्या बुधवारी अमेठी येथील प्रचारसभेत बोलत होत्या. यावेळी प्रियंका यांनी म्हटले की, जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेली DRDO देशातील उत्कृष्ट संस्थांपैकी एक आहे. या संस्थेचा मला अभिमान असल्याचे प्रियंका यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी ट्विट करून आपण लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. यापूर्वी नोटाबंदीचा निर्णयही मोदींनी अशाप्रकारेच अचानकपणे जाहीर केला होता. त्यामुळे मोदी काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर इस्रोने क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याची घोषणा मोदींनी केली होती. साहजिकच संपूर्ण देशभरात याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया उमटली होती.
मात्र, मोदींनी निवडणुकीच्या काळात फायदा उठविण्यासाठी ही घोषणा केल्याचा आक्षेप विरोधकांनी नोंदवला. त्यांच्या या भाषणामुळे निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग झाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. पंतप्रधानांना आज दूरचित्रवाहिन्यांचा एक तास मोफत प्रसिद्धीचा मिळाला आणि बेरोजगारी, महिलांची असुरक्षितता अशा जमिनीवरच्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष अवकाशात वळवता आले, असा टोला समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी लगावला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोदी यांच्या भाषणाची तपासणी करा, असे आदेश दिले आहेत.
अवकाशातील उप्रगह पाडण्यासाठी इस्रोने विकसित केलेल्या ‘ए-सॅट’ उपग्रहामुळे भारत जगातील मोजक्या राष्ट्रांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. यापूर्वी रशिया, अमेरिका आणि चीनलाच अशी कामगिरी करता आलेली होती.