नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यातही पक्षात नुकताच सरचिटणीसपदाचा कार्यभार स्वीकारलेल्या प्रियांका गांधी यांच्यासाठी ही निवडणूक त्यांचे राजकीय भवितव्य निश्चित करणारी ठरणार आहे. प्रियांका गांधी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एका मागून एक बैठकांचा धडाकाच लावला आहे. पुढील लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काय रणनिती आखावी लागेल, यासाठी उत्तर प्रदेशातील पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची काल सुरू झालेली बैठक आज (बुधवार) पहाटे साडेपाच वाजता संपली. तब्बल १६ तास ही बैठक चालली. कोणताही ब्रेक न घेता या बैठकीमध्ये प्रियांका गांधी यांनी पक्षाचे संघटने कसे आहे, कोणत्या गोष्टी बदलायला हव्यात, याबद्दल माहिती घेतली.
प्रियांका गांधी यांच्याकडे सरचिटणीसपद सोपविण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश हे राज्य काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. त्यापैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील आहे. एकीकडे सत्ताधारी भाजप तर दुसरीकडे सप-बसप या दोन्ही पक्षांची आघाडी समोर असताना काँग्रेसला आपले स्थान मजबूत करणे आणि जागा जिंकणे यावर मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यासाठीच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणले असून, त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविली आहे.
अमेठी आणि रायबरेलीसह उत्तर प्रदेशातील आठ लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. मंगळवारी दुपारी प्रियांका गांधी यांचे जयपूरहून लखनऊमध्ये आगमन झाल्यावर या मॅरेथॉन बैठकीला सुरुवात झाली. ती बुधवारी सकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होती. जयपूरमध्ये कालपासूनच प्रियांका गांधी याचे पती रॉबर्ट वाड्रा यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारीही रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचले आहेत.
१६ तास चाललेल्या बैठकीनंतर प्रियांका गांधी यांनी पत्रकारांना सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या संघटनेबद्दल मला खूप माहिती या बैठकीतून मिळाली. संघटनेची रचना कशी आहे, ते समजले आणि कोणते बदल करायला हवेत, हे सुद्धा ठरवता आले.