President Election | राष्ट्रपतींच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्रातील आमदार- खासदारांची भूमिका किती महत्वाची?

देशात नवीन राष्ट्रपती निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत असून त्याजागी नवीन राष्ट्रपतींची निवड करण्यात येईल.

Updated: Jun 10, 2022, 03:13 PM IST
President Election | राष्ट्रपतींच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्रातील आमदार- खासदारांची भूमिका किती महत्वाची? title=

मुंबई : देशात नवीन राष्ट्रपती निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत असून त्याजागी नवीन राष्ट्रपतींची निवड करण्यात येईल. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वसामान्यांचा सहभाग नसून निवडून आलेले लोकप्रतिनिधी भाग घेतात. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची निवड 17 जुलै 2017 रोजी करण्यात आली होती. तेव्हा जवळपास पन्नास टक्के मते एनडीएच्या बाजूने होती, तसेच प्रादेशिक पक्षांतील बहुतांश पक्षांचा पाठिंबा होता. यावेळीही काही प्रादेशिक पक्षांच्या मदतीने एनडीए आपल्या मर्जीतील राष्ट्रपती निवडण्याच्या जवळ आहे. मात्र, येत्या काही दिवसांत होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीनंतर त्याचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

2017 साली झालेल्या निवडणुकीपेक्षा यावर्षी मतांचे मूल्य कमी 

गत राष्ट्रपती पदाची निवडणूक 2017 साली झाली होती. 2017 साली एकूण मतांचे मूल्य 10 लाख 98 हजार 903 इतके होते. तसेच मतदारांची संख्या 4896 इतकी होती. यावर्षी एकूण मतदारांची संख्या 4809 इतकी आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा आता अस्तित्वात नाही. तेवढ्या मतदारांची संख्या वगळून मूल्य निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा एकूण मतांचे मूल्य हे 10 लाख 86 हजार 431 इतके असणार आहे. खासदारांच्या मताचे मूल्य आता 700 आहे. तर 2017 हेच मूल्य 708 इतके होते. आमदारांच्या मूल्यामध्ये यावर्षी कोणताही बदल झालेला नाही.

महाराष्ट्रातील मतांचे मूल्य किती?

आमदाराच्या बाबतीत, ज्या राज्यातील आमदार आहे त्या राज्यातील लोकसंख्या पाहिली जाते. यासोबतच त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्याही विचारात घेतली जाते. मूल्य मोजण्यासाठी, राज्याची लोकसंख्या एकूण आमदारांच्या संख्येने भागली जाते. अशा प्रकारे प्राप्त झालेल्या संख्येला 1000 ने भागले जाते. आता जो आकडा उपलब्ध आहे तो त्या राज्यातील आमदाराच्या मताचे मूल्य आहे.

महाराष्ट्रात राज्य विधानसभेचे 288 आमदार, 48 खासदार आणि 19 राज्यसभेचे खासदार आहेत. विधानसभेच्या आमदारांच्या मतांचे मूल्य 50,400 आहे. खासदारांच्या मतांचे मूल्य 46900 आहे. देशात आमदारांच्या सर्वाधिक मतांचे मूल्य हे 208 असून ते उत्तर प्रदेशातील आहे.

एकल हस्तांतरणीय मत

या निवडणुकीत एका विशिष्ट पद्धतीने मतदान केले जाते, ज्याला एकल हस्तांतरणीय मतदान प्रणाली म्हणतात. म्हणजेच मतदार एकच मत देतो, पण तो सर्व उमेदवारांमध्ये आपला प्राधान्यक्रम ठरवतो. म्हणजेच त्याची पहिली पसंती कोण आणि दुसरी, तिसरी कोण हे तो मतपत्रिकेवर सांगतो. पहिल्या पसंतीच्या मतांवरून विजेते ठरले नसल्यास, मतदाराची दुसरी पसंती नवीन एकल मत म्हणून उमेदवाराच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. म्हणून त्याला एकल हस्तांतरणीय मत म्हणतात.

मतांची मोजणी

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवून विजय निश्चित होत नाही. मतदारांच्या एकूण मतांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे खासदार आणि आमदारांच्या मतांपैकी ज्याला मत मिळते तो राष्ट्रपती होतो. सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजमध्ये सदस्यांच्या मतांची एकूण वॅल्यू 10 लाख 86 हजार 431 आहे. विजयासाठी उमेदवाराला 543216 वॅल्यू इतके मते मिळवावी लागतील.

यंदाची राष्ट्रपती निवडणूक ही 16 वी निवडणूक असणार आहे. आतापर्यंत एकदाही राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध झालेली नाही. देशाचे पहिले राष्ट्रपती होण्याचा मान डॉ. राजेंद्र प्रसाद यांना मिळाला होता. 1974 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या नियमात बदल करण्यात आले. त्यानुसार सूचक आणि अनुमोदक म्हणून 50 लोकप्रतिनिधींची स्वाक्षरी आवश्यक असते.