मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (President Election 2022) आपला उमेदवार उभा करण्यासाठी विरोधकांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पण विरोधकांच्या बैठकीत सुचवलेल्या सर्व नावांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने विरोधकांना फटका बसला आहे.
सर्वात आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव आघाडीवर होतं. पण त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. शरद पवार यांच्यानंतर फारुख अब्दुला, देवेगौडा आणि आता पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांनी देखील नकार दिला आहे. आगामी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची विरोधी पक्षनेत्यांची विनंती त्यांनी फेटाळून लावली आहे.
गोपाळकृष्ण गांधी (Gopalkrishna Gandhi) म्हणाले की, निवडणुकीसाठी उमेदवार असा असावा, ज्याने राष्ट्रीय एकमत निर्माण करावे आणि विरोधी ऐक्य सुनिश्चित करावे. आपल्या निवेदनात त्यांनी आगामी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीमध्ये आपल्या नावाचा विचार केल्याबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले.
गांधी म्हणाले की, मी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भावनांचा आदर करतो. परंतु याचा सखोल विचार केल्यावर मला असे दिसते की विरोधी उमेदवार असा असावा की विरोधी ऐक्याशिवाय राष्ट्रीय एकमत आणि राष्ट्रीय वातावरण तयार व्हावे. मला वाटते की माझ्यापेक्षा बरेच चांगले काम करणारे इतर असतील.
77 वर्षीय गोपालकृष्ण गांधी यांनी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत भारताचे उच्चायुक्त म्हणूनही काम केले आहे. ते महात्मा गांधी आणि सी राजगोपालाचारी यांचे नातू आहेत.