नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोच्च न्यायालयात चार नव्या न्यायाधीशांची नियुक्ती केलीय. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. भूषण रामचंद्र गवई, हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश न्या. सूर्यकांत, झारखंडचे मुख्य न्यायाधीश न्या. अनिरुद्ध बोस आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. अज्जिकुत्तीरा सोमय्या बोपण्णा हे चार न्यायाधीश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात रुजू झाले. या नव्या नियुक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३१ या कमाल मंजूर पदांएवढी पूर्ण झाली आहे. न्या. गवई यांच्या नेमणुकीने सर्वोच्च न्यायालयास १० वर्षांनंतर पुन्हा अनुसूचित जातीचा न्यायाधीश मिळाला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी या चार नव्या न्यायाधीशांच्या नेमणुकीची ‘वॉरन्ट’ जारी केली होती. न्यायालयाच्या क्र. १ च्या मुख्य न्यायदालनात झालेल्या छोटेखानी समारंभात सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांनी आपल्या या नव्या सहकारी न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. उन्हाळी सुटी सुरु असूनही इतरही अनेक न्यायाधीश या शपथविधीला आवर्जुन उपस्थित होते. या चारही न्यायाधीशांनी लगेच खंडपीठांवर बसून न्यायिक काम सुरुही केले.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं ९ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. भूषण रामकृष्ण आणि हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश न्या. सूर्यकांत यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी पदोन्नती करण्याची शिफारस केली होती.
अखिल भारतीय उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या संयुक्त वरिष्ठतेच्या यादीत न्या. बोस १२ व्या स्थानावर तर न्या. बोपन्ना ३६ व्या स्थानावर आहेत.