४५ दिवस चालणाऱ्या प्रयागराज कुंभमेळ्याला शाही स्नानानं सुरुवात

मंगळावर सायंकाळी ४ वाजेपर्यंत आखाड्यांचं शाही स्नान सुरू राहील

Updated: Jan 15, 2019, 08:27 AM IST
४५ दिवस चालणाऱ्या प्रयागराज कुंभमेळ्याला शाही स्नानानं सुरुवात title=

प्रयागराज : हिंदू धर्मातला अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा कुंभमेळा प्रयागराज इथं सुरू झालाय. आज या कुंभमेळ्यातलं पहिलं शाही स्नान आहे. या पर्वणीसाठी देशविदेशातील लाखो भाविक मंदिरांच्या नगरीत जमा झालेत. शाही स्नानामध्ये १२ आखाड्यांचे साधूसंत गंगास्नान करतील. त्यानंतर भाविकांनाही स्नानाची पर्वणी साधता येईल.

शाही स्नानामध्ये सर्वात अगोदर वेगवेगल्या आखाड्यांचे साधू स्नान करतात. पहाटेच सूर्याच्या पहिल्या किरणासोबत सर्वात अगोदर जुना आखाडा स्नानासाठी निघाला. ढोल-ताशांसहीत नागा साधू आणि संतांचा घोळका स्नानासाठी निघाला. मंगळावर सायंकाळी ४ वाजेपर्यंत आखाड्यांचं हे शाही स्नान सुरू राहील. साधुसंतांसोबतच इतर श्रद्धाळू लोकही गंगा आणि यमुना नदीच्या संगम घाटावर स्नानाचा आनंद घेत आहेत. 

कुंभमेळा २०१९ | शाही स्नान
कुंभमेळा २०१९ | शाही स्नान

पुढच्या तब्बल ४५ दिवस सुरू राहणाऱ्या या कुंभमेळ्यात १५ करोडहून अधिक लोक सहभागी होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. कुंभमेळ्यात देश-विदेशातून लोक सहभागी होतात. १५ जानेवारीपासून सुरू होणारं हे कुंभ ४ मार्चपर्यंत सुरू राहील. या कुंभमेळ्यातील दुसरं शाही स्नान ४ फेब्रुवारी तर तिसरं स्नान १० फेब्रुवारी रोजी पार पडेल. 

कुंभमेळा २०१९ | शाही स्नान
कुंभमेळा २०१९ | शाही स्नान

कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी लग्झरी टेंटचीही व्यवस्था करण्यात आलीय. श्रद्धाळुंसाठी गंगा नदीच्या किनाऱ्यावरच ३२०० एकर क्षेत्रात एक छोटं तात्पुरतं शहर निर्माण करण्यात आलंय. इथल्या प्रत्येक तंबूचं भाडं प्रतिदिन २१०० रुपयांपासून ते २०,००० रुपयांपर्यंत आहे. या गर्दीसाठी १,२०,००० शौचालयांची निर्मितीही करण्यात आलीय तसंच सफाई कर्मचाऱ्यांची संख्याही दुप्पट करण्यात आल्याची माहिती कुंभ प्रशासनानं दिलीय.