अखेर 'त्या' वक्तव्याविषयी साध्वी प्रज्ञांनी मागितली माफी

करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले.

Updated: Apr 19, 2019, 09:33 PM IST
अखेर 'त्या' वक्तव्याविषयी साध्वी प्रज्ञांनी मागितली माफी title=

भोपाळ: मुंबई एटीएसचे प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अखेर शुक्रवारी संध्याकाळी आपले शब्द मागे घेतले. माझ्या वक्तव्यामुळे देशाच्या शत्रुंचा फायदा होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मी माझे शब्द मागे घेत असून त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त करते. मात्र, ते माझे वैयक्तिक दु:ख आहे, असे साध्वी प्रज्ञा यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. 

साध्वी प्रज्ञासिंह यांनी शुक्रवारी सकाळी हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक विधान केले होते. करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळेच झाला. मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल, अशा शाप दिला होता. तो अखेर खरा ठरला, असे वक्तव्य साध्वी यांनी केले होते. साध्वी यांच्या या विधानाने देशभरात मोठी खळबळ माजली. अनेकांनी साध्वी प्रज्ञा आणि भाजपवर सडकून टीकाही केली होती. 

या पार्श्वभूमीवर भाजपने पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली होती. या पत्रकात भाजपने म्हटले आहे की, आमच्यासाठी करकरे शहीदच आहेत. साध्वी यांचे मत वैयक्तिक आहे. कदाचित तुरुंगात असताना भोगाव्या लागलेल्या शारीरिक आणि मानसिक हालअपेष्टांमुळे त्या अशाप्रकारे व्यक्त झाल्या असाव्यात, अशी सारवासारव भाजपने केली होती. 

साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. भाजपने त्यांना भोपाळ मतदारसंघातून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या उमेदवारीवर अनेकांना प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.