मोदी आणि शहांविरोधातील तक्रारींवर लवकर निर्णय घ्या; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

यापूर्वीच्या दोन प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाने मोदींनी क्लीन चीट दिली होती.

Updated: May 2, 2019, 04:51 PM IST
मोदी आणि शहांविरोधातील तक्रारींवर लवकर निर्णय घ्या; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश  title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातील आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींवर ६ मे पूर्वी निर्णय घ्यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले. काँग्रेसने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघनाच्या ११ तक्रारी दाखल केल्या होत्या. यापैकी मोदींविरोधातील दोन तक्रारींसंदर्भात निवडणूक आयोगाने नुकताच निकाल दिला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये मोदींना क्लीन चीट मिळाली होती. 

निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात बाजू मांडताना सांगितले की, आम्ही ११ पैकी २ तक्रारींबाबत निर्णय दिला आहे. सोमवारी मतदान असल्याने तक्रारींबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारपर्यंतचा कालावधी द्यावा, अशी विनंती निवडणूक आयोगातर्फे करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाची ही विनंती सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.

यंदाची लोकसभा निवडणूक राजकीय नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे चांगलीच गाजत आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, सपा नेते आझम खान आणि भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई केली आहे.