फॉलोअर्स वाढवण्यासाठी रस्त्यावर रिव्हर्समध्ये पळवली कार; पण स्वप्नातही विचार केला नसेल असं घडलं

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही तरुण भरधाव वेगाने रस्त्यावर वाहनं धावत असताना कार रिव्हर्स गेअरमध्ये पळवत आहेत. आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्यांनी हा जीवघेणा स्टंट केला.   

शिवराज यादव | Updated: Oct 29, 2023, 04:21 PM IST
फॉलोअर्स वाढवण्यासाठी रस्त्यावर रिव्हर्समध्ये पळवली कार; पण स्वप्नातही विचार केला नसेल असं घडलं  title=

रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होणाऱ्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही तरुणांनी सोशल मीडियावर आपण प्रसिद्ध व्हावं आणि फॉलोअर्स वाढावेत यासाठी चक्क वर्दळीच्या रस्त्यावर रिव्हर्स गेअरमध्ये कार पळवली. आपल्या या जीवघेण्या स्टंटसहित त्यांनी फक्त स्वत:चा नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घातला होता. पण प्रसिद्ध होण्याची ही हाव त्यांना चांगलीच महागात पडली असून, आयुष्यभराची अद्दल घडली आहे. 

गुरुग्राममधील तरुण, तरुणी नेहमीच काहीतरी जीवघेणे स्टंट करताना दिसत असतात. त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ असतानाही तीन तरुणांनी कार रिव्हर्स गेअरमध्ये पळवली. यामुळे आधीच वाहतूक कोंडी असणाऱ्या रस्त्यावर ट्राफिक जाम झालं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिघा तरुणांना अटक केली आहे. 

व्हिडीओत लाल रंगाची कार गोल्फ कोर्स रोडवर रिव्हर्स गेअरमध्ये पळताना दिसत आहे. यावेळी इतर तीन गाड्या त्याच्या पाठी दिसत आहेत. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणांचे फॉलोअर्स माहित नाही, पण अडचणी नक्की वाढल्या. तरुणांना थेट पोलीस  स्टेशन गाठावं लागलं. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्या कारही जप्त केल्या आहेत. 

प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, ज्या स्विफ्ट कारमध्ये हा स्टंट करण्यात आला ती मॉडिफाय करण्यात आली होती. तसंच सफेद रंगाच्या या कारला लाल रंग देण्यात आला होता. सहाय्यक पोलीस आयुक्त कपिल अहलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, "23 ऑक्टोबरला हे तरुण बेदरकार आणि बेजबाबदारपणे गोल्फ कोर्स रोडवर गाडी चालवताना दिसले. कारमध्ये स्टंट करताना ते रिलसाठी शूट करत होते".

यावेळी त्यांनी तरुणांना असे धोकादायक स्टंट करण्याचं आवाहन केलं आहे. हे फक्त तुमच्यासाठीच नाही तर इतरांसाठीही धोकादायक आहे असं ते म्हणाले आहेत. 

गुरुग्राममधील अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. शहरातील अनेक रस्त्यांवर अनेकदा असे धोकादायक स्टंट केले जातात. गुरुग्राममध्ये वाहनांच्या छतावर फटाक्यांची आतषबाजी करण्यासह इतर अनेक व्हिडिओ अलीकडेच व्हायरल झाले होते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x