भोंगळपणाची हद्द! तब्बल 42 लाखांच्या नोटांचा झाला चुराडा, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

आपले पैसे सुरक्षित राहावे म्हणून आपण पैसे बँकेत जमा करतो. मात्र, बँक तुमचे पैसे खरंच सांभाळून, जबाबदारीने ठेवते का?

Updated: Sep 17, 2022, 11:01 PM IST
भोंगळपणाची हद्द! तब्बल 42 लाखांच्या नोटांचा झाला चुराडा, नेमकं घडलं काय? जाणून घ्या title=

PNB currency melting: आपले पैसे सुरक्षित राहावे म्हणून आपण पैसे बँकेत जमा करतो. मात्र, बँक तुमचे पैसे खरंच सांभाळून, जबाबदारीने ठेवते का? या बातमीमध्ये तुम्ही जे वाचणार आहात हे समजल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. बँकांच्या भोंगळपणाचा उत्तम नमुना काय असू शकतो हे तुम्हाला या बातमीवरून समजू शकेल. पंजाब नॅशनल बँकेतील अशाच तब्बल 42 लाख रुपयांच्या नोटांना पाणी लागून या नोटांचा पूर्णपणे खराब झाल्याचं उघड झालं आहे.

नेमकं झालं काय? 

साधारणतः तीन महिन्यांपूर्वी एका बॉक्समध्ये नोटा भरून बँकेत ठेवल्या गेलेल्या. याचदरम्यान काही कारणांनी या बॉक्समध्ये पाणी गेलं. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी वरील नोटांकडे लक्ष दिलं, मात्र बॉक्समधील खालच्या नोटांकडे दुर्लक्ष केलं. बँकेच्या कर्मचाऱ्यांना बॉक्समधील खालच्या नोटा सुकल्या असतील असं वाटलं आणि तिथेच झाला घोळ.  

सूत्रांच्या माहितीनुसार बँकेच्या तिजोरीत जागा नव्हती. बँकेतील कॅश वाढल्यामुळे नोटांना बॉक्समध्ये भरून एका भिंतीपाशी ठेवण्यात आलं होतं. पावसाळ्याचे दिवस आहेत. अशात बेसमेंटमध्ये भिंतीला टेकून ठेवलेल्या बॉक्समध्ये भिंतींचं पाणी गेलं. बराच वेळ याकडे दुर्लक्ष झाल्याने नोटा पाण्याने खराब झाल्या. 

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) पथक पाहणीसाठी आलं. तपास सुरू झाल्यावर हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले. प्रकरणाचं गांभीर्य पाहाता याबाबत पुढील तपास करण्यासाठी पुन्हा आणखी एक टीम आली. या तपासानंतर पीएनबीच्या दक्षता पथकानेही तपास सुरू केला. अखेर नोटांची दखल का घेतली जात नाही, याबाबत प्रश्न गंभीर उपस्थित करण्यात आले. 

या घटनेनंतर PNB बँकेतील चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं.  यामध्ये बँकेतील सिनियर मॅनेजर देवीशंकर, मॅनेजर आसाराम, ऑफिसर राकेश कुमार, आणि वरिष्ठ मॅनेजर भास्कर कुमार भार्गव यांचा समावेश आहे. सध्या बँकेकडून याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. हा सगळा भोंगळ प्रकार कानपूरमधील पांडू नगरच्या पंजाब नॅशनल बँकेच्या  ब्रांचमधील आहे.