नवी दिल्ली : देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत तुमचं अकाऊंट आहे? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेतून तब्बल ११,४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं आहे. यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली.
भारताच्या बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचं बोललं जात आहे. हा घोटाळा उघड झाल्यानंतर बँकेने आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पीएनबीने आपल्या ग्राहकांसाठी काही निर्देश दिले आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, बँकेचं कामकाज सामान्यपणे सुरु आहे आणि बँकेतून पैसे काढण्यासाठी कुठल्याही प्रकारची अट किंवा बंधन नाहीये.
हा घोटाळा उघड झाल्यानंतर बँकेने पैसे काढण्यावर निर्बंध घातले आहेत, बँकेतून केवळ ३००० रुपये काढू शकतो अशा प्रकारच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियात येत आहेत. यावर बँकेने भाष्य करताना म्हटलं आहे की, अशा प्रकारे पैसे काढण्याचे कुठलेही निर्बंध ग्राहकांवर नाहीयेत.
पंजाब नॅशनल बँकेने स्पष्ट केलयं की, सोशल मीडियात येणाऱ्या बातम्यांत तथ्य नाहीये. बँकेने कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं नाहीये. जर बँकेने असा कुठलाही निर्णय घेतला तर तसं अधिकृतपणे ग्राहकांना कळविण्यात येईल तसेच प्रत्येक ग्राहकाला SMS द्वारे अलर्टही करण्यात येईल.
पीएनबी बँक घोटाळ्यानंतर कर्मचाऱ्यांची बदली झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. बँकेच्या तब्बल १८००० कर्मचाऱ्यांची बदली झाल्याचं वृत्तही आलं होतं. मात्र, या वृत्तात तथ्य नाहीये. केवळ १४१५ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे आणि हे सर्व बँकेच्या पॉलिसीनुसार करण्यात आलं आहे.