शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, म्हणाले

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला.

Updated: Nov 15, 2021, 09:31 AM IST
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, म्हणाले title=

नवी दिल्ली: बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून शोक व्यक्त केला. येणाऱ्या पिढ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडण्याची ताकद त्यांनी निर्माण केली होती. शिवचरित्र घरोघरी पोहोचावे आणि लहान मुलांमध्ये ते रुजावं यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. 

पंतप्रधान मोदी ट्वीट करत म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृतीच्या जगात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळे येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी अधिक जोडल्या जातील. त्यांनी केलेलं काम स्मरणात राहील.

बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिया झाला होता. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

जाणता राजा या महानाट्याचे 27 वर्षात त्यांनी 1250 हून अधिक प्रयोग केले. त्यांनी 2015 पर्यंत 12 हजारहून अधिक छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यानेही दिली आहेत. बाबासाहेबांनी नुकतेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते. त्यांच्या निधनाने एक इतिहास तज्ज्ञ गमावल्याची भावना जाणकारांनी व्यक्त केली आहे.