झांशी : पाकिस्तान सध्या भीक मागत फिरतोय, त्यांना त्यांच्या कर्माची अद्दल नक्की घडवणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. झाशी येथे झालेल्या सभेमध्ये त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पुलवामा येथे भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 हून अधिक जवान शहीद झाले. देशभरातून याबद्दल संताप व्यक्त होत आहे. या दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानवरही देशभरातून टीकेचा वर्षाव होत आहे.
आज पाकिस्तान कर्जामध्ये पुरता बुडाला आहे. ते कटोरा घेऊन फिरत आहेत आज जगाकडून सहज मदत देखील त्यांना मिळू शकत नाही. अशा स्थितीत भारतावर हल्ला करुन त्यांना वाटते की भारताची स्थितीही वाईट होईल. पण शेजाऱ्यांच्या मनसूब्यांचा देशातील 120 कोटी लोक मिळून त्याचे तोडीस तोड उत्तर देत आहेत. आज जगातील देश या हल्ल्याची निंदा करत आहेत.
ही धरती मणिकर्णिकाच्या शौर्य भूमीची धरती आहे. स्वराज्यावर जेव्हा आक्रमण होते तेव्हा ते परतवून कसे लावायचे हे या भूमीने आम्हाला शिकवले आहे. त्यामुळे आमच्यावर हल्ला करणाऱ्यांची खैर नाही असे पंतप्रधानांनी ठणकावून सांगितले.
१. पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा भारताने काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. १९९६ पासून पाकिस्तानला भारताकडून व्यापारात सूट मिळत होती ती सूट आता बंद होणार आहे.
२. परराष्ट्र मंत्रालय आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी सगळ्या देशांसोबत चर्चा करणार आहे. जगासमोर पाकिस्तानला खरा चेहरा आणण्यासाठी भारत पाऊल उचलणार आहे.
३. २९८६ मध्ये भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाची परिभाषा बदलण्याचा प्रस्ताव दिला होता. आता हा प्रस्ताव पास करण्यासाठी आणखी प्रयत्न केला जाणार आहे. हा प्रस्ताव पास करण्यासाठी इतर देशांवर दबाव टाकला जाणार आहे.
४. गृहमंत्री राजनाथ सिंह शनिवारी सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत राजनाथ सिंह पुलवामा हल्ल्याबाबत सर्व पक्षांसोबत विस्ताराने चर्चा करणार आहेत.
५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईसाठी भारतीय जवानांना स्वातंत्र्य दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली आहे. आम्ही जवानांना खुली सूट दिली आहे.