यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यवतमाळ आणि धुळे जिल्ह्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या भूमीपूजनासह, रस्त्यांची कामे, घरकुल वितरण यासारख्या विविध विकासकामांची पायाभरणी केली जाणार आहे. दरम्यान, मोदींच्या दौऱ्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जम्मू- काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धुळे जिल्हा दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमानुसार धुळ्याला येतील.
यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी पांढरकवडा इथे बचतगटाच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. जिल्ह्यात महिला बचतगटाचे मोठे जाळे असून 17 हजार पेक्षा जास्त बचत गट चांगले कार्य करत आहेत. या सर्व महिलांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पांढरकवडा इथे येणार आहेत. सकाळी १०.३० वाजता महिला बचत गटाच्या मेळाव्यासाठी ते येणार असून इथे सभासुद्धा घेणार आहेत.