'यापुढे असं होता कामा नये', मोदींचा BJP आमदारांना दम; इशारा देत म्हणाले, 'दर महिन्याला...'

PM Modi Warns BJP MLA: पंतप्रधान मोदींनी जवळपास दीड तास आमदारांशी संवाद साधताना अनेक विषयांबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र याचवेळी त्यांनी आमदारांना थेट इशाराही दिला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 6, 2024, 11:48 AM IST
'यापुढे असं होता कामा नये', मोदींचा BJP आमदारांना दम; इशारा देत म्हणाले, 'दर महिन्याला...' title=
पंतप्रधानांनी बैठकीत दिला इशारा

PM Modi Warns BJP MLA: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थान दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना बदल्या करण्याचं राजकारण करु नये असा सल्ला दिला आहे. अशा राजकारणापासून सावध राहा असंही मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी रात्री भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये नवनिर्वाचित आमदारांबरोबर बैठक घेतली. या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी आमदारांना विशिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी शिफारशी करु नयेत असं सांगितलं आहे. भाजपा आमदारांना सल्ला देताना, आपलं काम ध्येय धोरणं ठरवणं आणि ती लागू करण्याचं आहे, अशी आठवण करुन दिली.

आमदारांना दिला इशारा

भाजपाच्या आमदारांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी प्रशासकीय आणि सरकारी अधिकाऱ्यांबरोबर तुमचं वर्तन नियमांनुसार आणि चांगलं असायला हवं, असं सांगितलं. आम्हाला आताच अधिकाऱ्यांशी गैरवर्तन होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. या पुढे असं होता कामा नये, असा इशाराच मोदींनी दिला. इतकच नाही तर पंतप्रधान मोदींनी भैरोसिंह शेखावत आणि स्वत:चं उदाहरण देत खासदारांना समजावण्याचा प्रयत्न केला. शेखावत आणि मी कधीच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या राजकारणात पडलो नाही, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी भाजपाच्या आमदारांशी जवळपास दीड तास संवाद साधला.

दर महिन्याला एका गावात जाऊन राहा, स्वत:चा डबा न्या

दर महिन्याला आमदारांनी एका वेगवेगळ्या गावात मुक्काम करावा, असा सल्लाही पंतप्रधानांनी राजस्थानमध्ये निवडून आलेल्या भाजपा आमदारांना दिला. गावामध्ये जाताना आपला डबा घेऊन जा. तिथल्या लोकांच्या समस्या समजून घ्या. तिथल्या कार्यकर्त्यांना भेटा, असा सल्लाही मोदींनी दिला. दर महिन्याला आमदारांनी असं केलं तर पाच वर्षांमध्ये त्यांचा 60 गावांमध्ये मुक्काम झाला असेल. तसेच संघटनेतील पदाधिकाऱ्यांबरोबर काम करत रहावे असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. काम करणारी कोणतीही व्यक्ती कोणत्याही पदाला जाऊ शकते, असंही मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी नंतर राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चा केली.

डबल इंजिन सरकारचा लाभ सांगा

पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या आमदारांना घरोघरी जाऊन 'डबल इंजिन' सरकारचा फायदा घेण्याचं आवाहन करावं, असं सांगितलं. या बैठकीमध्ये सर्व मंत्री, आमदार, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र कौटुंबिक कारणास्तव वसुंधरा राजे बैठकीला उपस्थित नव्हत्या, अशी माहिती नगर विकास आणि स्वायत्त शासन मंत्री झाबर सिंह यांनी दिली. बैठकीमध्ये भजनलाल शर्मा यांनी इंदिरा रसोई योजनेचं नाव बदलून श्री अन्नपूर्णा रसोई योजना असं करण्याची घोषणा केली.