PM Modi Rojgar Mela : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज 'रोजगार मेळाव्या'त (Rozgar Mela) 71 हजार युवकांना नोकरीचे नियुक्ती पत्र (appointment letters) दिले जाणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेद्र मोदी यांना 75 युवकांना नोकरीचे नियुक्ती पत्र दिले होते. या रोजगार मेळाव्यांमधून 10 लाख युवकांना रोजगार मिळवून देण्याचे लक्ष्य मोदी सरकारने ठेवले आहे. याआधी सर्व मंत्रालये आणि सरकारी खात्यांमधील मनुष्यबळाच्या स्थितीचा आढावा घेण्याचे आदेश जून महिन्यात पंतप्रधान मोदींनी दिले होते. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पदभरती करण्यास सुरुवात झाली आहे. ही भरती थेट मंत्रालयांकडून किंवा यूपीएससी, एएसी, रेल्वे रिक्रूव्हमेंट बोर्डाद्वारे केली जात आहे.
देशभरातील विविध ठिकाणच्या युवकांना रोजगार मेळाव्याअंतर्गत नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यामुळे 45 ठिकाणी ही नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार पंतप्रधान मोदींनी रोजगार निर्मितीला आपले पहिले प्राधान्य घोषित केले होते ते वचन पूर्ण करत असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान कर्मयोगी प्रमुख मॉड्युल देखील लॉन्च करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी दिली होती. या मॉड्यूलनुसार विविध सरकारी विभागांमधील सर्व नवीन भरतीसाठी एक ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. या कोर्समध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता, कामाच्या ठिकाणी नैतिकता आणि सचोटी, मानव संसाधन धोरणे आणि इतर फायदे आणि भत्ते यांचा समावेश असेल.
या रोजगार मेळाव्यांमध्ये 38 मंत्रालये आणि या अंतर्गत येणाऱ्या खात्यांमधील गट अ आणि ब (राजपत्रित), गट ब (बिगर राजपत्रित) आणि गट क अशा तिन्ही गटांमधील पदे भरण्यात येत आहेत. संरक्षण दल, उपनिरीक्षक, हवालदार, कारकून, स्टेनो, साहाय्यक, आयकर निरीक्षक ही पदे या रोजगार मेळाव्याद्वारे भरली जात आहेत. शिक्षक, प्राध्यापक, परिचारिका, नर्सिंग अधिकारी, डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर आणि इतर तांत्रिक आणि पॅरा मेडिकल पदांवरही नियुक्ती केली जाणार असल्याचे माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली.