नवी दिल्ली : ईदच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अल्पसंख्यांक समाजाला मोठी भेट दिलीय. देशातल्या ५ कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आलीय. यात २.५ कोटी विद्यार्थिनींचाही समावेश आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे अल्पसंख्य समाजात आनंदाचं वातावरण आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमधील अल्पसंख्याक मंत्रालयाने काही महत्त्वाच्या योजना बनवल्या आहेत. मंत्रालयाने पुढच्या ५ वर्षामध्ये अल्पसंख्याक वर्गाच्या ५ कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.
अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी 'पढ़ो-बढ़ो' अभियान चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्याक कल्याण मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी थ्री ई (एजुकेशन, एम्प्लॉयमेंट, एम्पावरमेंट) चं लक्ष्य ठेवलं आहे. पदभार सांभाळताच त्यांनी अधिकाऱ्यांसोबत पहिली बैठक घेतली.
शिक्षण, रोजगार आणि सशक्तीकरण यामुळे सामाजिक आर्थिक स्थिती बदलली जावू शकते. ज्या ५ कोटी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यामध्ये ५० टक्के विद्यार्थिनींचा समावेश केला जाणार आहे. शिक्षण आणि रोजगाराची माहिती देण्यासाठी शंभरहून अधिक मोबाईल वॅनचा वापर केला जाईल.