PHOTO : राजीव गांधींची लक्षद्वीप सहल आर. के. लक्ष्मण यांच्या नजरेतून...

त्यावेळीही तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना आयएनएस विराटसारख्या युद्धनौकेचा वापर खाजगी कारणासाठी करण्यावरून टीकेचा धनी व्हावं लागलं होतं

शुभांगी पालवे | Updated: May 9, 2019, 11:44 AM IST
PHOTO : राजीव गांधींची लक्षद्वीप सहल आर. के. लक्ष्मण यांच्या नजरेतून... title=
फाईल फोटो

मुंबई : 'आम आदमी'चे निर्माते आर के लक्ष्मणं यांनी अबोल क्षणांनाही बोलायला भाग पाडलं. इतर लोक जे पाहू शकत नव्हते अशा गोष्टींचं निरीक्षण त्यांचा 'आम आदमी' करत होता. लोकशाहीत डोकावण्याचं काम त्यांच्या लक्ष्मण यांच्या 'आम आदमी'नंच केलंय. आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्राची आठवण येण्याचं कारण म्हणजे, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी परिवारावर आत्तापर्यंतच्या प्रचारातला सर्वाधिक खळबळजनक आरोप... आयएनएस विराट ही युद्धनौका गांधी परिवाराने सुट्टीतली मौजमजा करण्यासाठी खासगी टॅक्सीसारखी वापरली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला.

खरं म्हणजे, डिसेंबर १९८७ मध्ये आर. के. लक्ष्मण यांच्यातल्या 'आम आदमी'लाही ही बाब खटकली होती. त्यामुळेच त्यांनी एका व्यंगचित्राच्या माध्यमातून ही गोष्ट जगासमोर मांडली. लक्ष्मण यांच्या या व्यंगचित्रात निसर्गाच्या सानिध्यात एका झाडाखाली निवांत बसलेले राजीव गांधी आणि सोनिया गांधी दिसत आहेत... आणि 'रिलॅक्स राजीव! आता तुम्ही समस्या, घोटाळे, महागाई, दंगे, गरीबी, भांडवलशाही, समाजवाद यांसारख्या प्रश्नांपासन दूर आहात आणि आत्ताच तुम्ही पुढे आराम करण्यासाठी कुठे जायचं याच्या चिंतेत आहात' असं सोनिया त्यांना म्हणताना या व्यंगचित्रात दिसत आहेत. 'देशाचं पहिलं कुटुंब सुट्टीवर' (The first family on vacation) असं शीर्षक या व्यंगचित्राला आर के लक्ष्मण यांनी दिलं होतं.  

 


आर के लक्ष्मण यांनी रेखाटलेलं व्यंगचित्र (फाईल)

दिल्लीतील रामलीला मैदानात जाहीर भाषणात बोलताना, गांधी परिवाराच्या आत्तापर्यंतच्या या कर्तृत्वावर टीका केली तर अनेकांचा पोटशूळ का उठतो? असा सवालही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. 'देशाचं सैन्य ही काही मोदींची खाजगी संपत्ती नाही' या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मोदींनी राजीव गांधींच्या लक्षद्वीप सहलीच्या वेळच्या प्रसंगांना उजाळा दिला. '१९८७ साली आपल्या खासगी सुट्टीसाठी गांधी परिवाराने आपल्या मित्र परिवारासह लक्षद्वीप बेटसमुहावरील करवत्ती बेटाजवळचं बंगरम बेट गाठलं. या निर्जन बेटावर पोहोचण्यासाठी गांधी परिवाराने 'आयएनएस विराट' ही तत्कालीन विमानवाहू युद्धनौका खासगी टॅक्सीसारखी वापरली... युद्धनौकेसह लष्करी हेलिकॉप्टर्सचाही त्यांनी वापर केला... हा नौदलाचा, आयएनएस विराट या युद्धनौके हा अपमान' असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. 

त्यावेळी विराट ही पश्चिम सीमेवर सागरी सुरक्षा सर्वेक्षणाच्या अभियानावर होती. मात्र तिची दिशा वळवून ती गांधी घराण्याच्या मौजमजेसाठी वापरण्यात आली असा दावा मोदींनी केला. केवळ गांधी परिवाराच्या दिमतीसाठी ही युद्धनौका १० करवत्ती बेटावर नांगर टाकून होती. गांधी परिवारासोबतच यावेळी सोनिया गांधींच्या माहेरची मंडळीही बेटावर उपस्थित होती. एवढ्या मोठ्या संख्येने परदेशी नागरिक आयएनएस विराटसारख्या अतिमहत्त्वाच्या युद्धनौकेवर नेणं हा सुरक्षेशी खेळ नाही का? असा सवाल मोदींनी केला. 

एका रिपोर्टनुसार, डिसेंबर १९८७ साली तत्कालीन राजीव गांधी कुटुंबीयांसोबत लक्षद्वीपच्या सुदूर बेटावर सहलीसाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी यांची आई, बहिण-मेव्हणे, त्यांची मुलं तसंच मित्र-मंडळींपैकी अमिताभ बच्चन, त्यांचे भाऊ अजिताभ बच्चन आणि जया बच्चनही उपस्थित होत्या. १० दिवसांची त्यांची ही सहल होती. गांधी कुटुंबीयांनी आपला हा गोपनीय दौरा मीडियापासून लपवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, राहुल गांधी आपल्या चार मित्रांसोबत लक्षद्वीप प्रशासनाच्या नारंगी-पांढऱ्या रंगाच्या एका हॅलिकॉप्टरमधून उड्डाण घेतलं आणि ते मीडियाच्या नजरेत आलेच... त्यामुळे या गोपनिय सहलीची बातमी मीडियाला कळलीच. त्यावेळीही तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना आयएनएस विराटसारख्या युद्धनौकेचा वापर खाजगी कारणासाठी करण्यावरून टीकेचा धनी व्हावं लागलं होतं.