नवी दिल्ली : इंधन दरवाढीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. कारण, इंधन दरवाढीला ब्रेक लागला असून आता पेट्रोल-डिझेलच्या दरात घट होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग १३व्या दिवशी घट झाली आहे. पाहूयात कुठल्या शहरात किती रुपयांनी स्वस्त झालं पेट्रोल आणि डिझेल.
राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात २० पैसे प्रति लिटर घट झाली आहे. तर, डिझेलच्या दरात ही घट झाल्याचं पहायला मिळत आहे. २९ मे २०१८ रोजी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ७८.४३ रुपये होती तर ११ जून २०१८ रोजी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर ७६.५८ रुपये झाला आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरु आहेत. तर, अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या अखत्यारित आणण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.
सोमवारी पेट्रोलच्या दरात २० पैशांनी कपात झाली आहे. यानंतर देशातील चार महानगरांपैकी दिल्लीत पेट्रोलचा दर ७६.५८ रुपये झाला आहे. तर मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर ८४.४१ रुपये झाला आहे.
तसेच राजधानी दिल्लीत एक लिटर डिझेलसाठी नागरिकांना ६७.९५ रुपये मोजावे लागत आहेत. तर, मुंबईत एक लिटर डिझेलचा दर ७२.३५ रुपये झाला आहे.