पेट्रोल-डिझेलच्या दरात ६ महिन्यातली सगळ्यात मोठी वाढ

तेल उत्पादक कंपनी सौदी अरामकोवर झालेल्या हल्ल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वारंवार वाढत आहेत.

Updated: Sep 18, 2019, 10:23 AM IST
पेट्रोल-डिझेलच्या दरात ६ महिन्यातली सगळ्यात मोठी वाढ  title=

मुंबई : तेल उत्पादक कंपनी सौदी अरामकोवर झालेल्या हल्ल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वारंवार वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्च्या तेलाच्या किंमती उसळल्या आहेत. बुधवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या भावात तेजी झाली आहे. पेट्रोल २५ पैसे आणि डिझेल २४ पैसे प्रती लीटरने वाढलं आहे. याआधी मंगळवारीही पेट्रोल १४ पैसे आणि डिझेल १५ पैशांनी वाढलं होतं.

मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव ७८.१० रुपये आणि डिझेलचे भाव ६९.०४ रुपये प्रती लीटर एवढे झाले आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल ७२.४२ रुपये आणि डिझेल ६५.८२ रुपये एवढं आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोल ७५.१४ रुपये आणि डिझेल ६८.२३ रुपये, चेन्नईमध्ये पेट्रोल ७५.२७ रुपये आणि डिझेल ६९.५८ रुपये एवढं आहे.

सौदी अरामकोच्या दोन प्लांटवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे तेल उत्पादन घटलं आहे. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या आयातीवर झाला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. बुधवारी वाढलेले पेट्रोल-डिझेलचे भाव हे मागच्या सहा महिन्यात वाढलेले सर्वाधिक आहेत.

येत्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या भावात १० डॉलरनी वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळी ब्रेंट क्रुड ऑईलचा भाव ६३.४० डॉलर प्रती बॅरल आणि डब्ल्यूटीआय क्रुड ऑईलचा भाव ५८.९६ डॉलर प्रती बॅरल आहे.