मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलसाठी तुम्हाला इतके रुपये का द्यावे लागतात यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला काही सांगणार आहोत.
पेट्रोल-डिझेलच्या दरात २०१४ पासून आतापर्यंत तीन वर्षातील उच्चांक गाठला आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत ७९ रुपयांच्या घरात पोहोचली आहे तर दिल्लीत एका लिटरसाठी ७० रुपये द्यावे लागत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या सतत होत असलेल्या वाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच गोंधळाचं वातावरणं ही आहे कारण, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत घट होत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या तीन वर्षांत ५० टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, असे असतानाही भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. १३ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ३०९३ रुपये प्रती बॅरल होती. २०१४मध्ये एक बॅरल कच्च्या तेलाची किंमत जवळपास ६ हजार रुपये होती. गेल्या तीन वर्षांत कच्च्या तेलाच्या किंमतीत जी घट झाली आहे त्याचा फायदा ग्राहकांना मिळालेला नाहीये.
इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम कच्च्या तेलाला रिफाईन करण्याचं काम करतात. कॅच न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, या कंपन्या एक लीटर कच्च्या तेलासाठी २१.५० रुपये देतात. यानंतर एन्ट्री टॅक्स, रिफाईनरी प्रोसेस, लँडिंग कॉस्ट आणि इतर ऑपरेशनल कॉस्ट यासर्वांचा खर्च पकडला तर एक लीटर पेट्रोल तयार करण्यासाठी ९.३४ रुपये खर्च येतो. म्हणजेच एक लीटर पेट्रोल तयार करण्यासाठी ऑईल कंपन्या जवळपास ३१ रुपये खर्च करतात. पण, आज जर तुम्ही १ लीटर पेट्रोलसाठी ७९ रुपये मोजत आहात तर यासाठी सरकारकडून लावण्यात येणारा टॅक्स जबाबदार आहे.
ऑईल कंपन्यांना एक लीटर पेट्रोल तयार करण्यासाठी ३१ रुपये खर्च येतो. त्यानंतर त्यावर केंद्र सरकारकडून टॅक्स आकारला जातो. म्हणजेच तुम्ही ४८ रुपयांहून अधिक रक्कम हे केवळ टॅक्स म्हणून देता. २०१४ पासून आतापर्यंत केंद्र सरकारने पेट्रोलवर एक्साईज ड्युटीत १२६ टक्क्यांनी वाढ केली आहे. तर, डिझेलवर लावण्यात येणाऱ्या ड्युटीत ३७४ टक्क्यांनी वाढ केली आहे.