टिकटॉकवर व्हिडिओ पाहणाऱ्यांनो सावधान...!

टिकटॉकवर जातांना सावधान...

Updated: Jan 9, 2020, 10:33 PM IST
टिकटॉकवर व्हिडिओ पाहणाऱ्यांनो सावधान...! title=

मुंबई : तुम्ही टिकटॉकवर व्हिडिओ टाकत असाल, नव्हे नुसते पाहात जरी असाल तरी ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुमची ही आवड धोकादायक ठरू शकते. तुमच्या मोबाईलमधली खासगी माहिती, तुमचे व्हिडिओ, फोटो चोरीला जाऊ शकतात.

टिकटॉक जेव्हा भारतात आला, तेव्हा त्यावर तरुणाईच्या उड्या पडल्या. जिकडे बघावं तिकडे लोक हे चिनी अॅप वापरून व्हिडिओ बनवत आहेत. मंदिर असो.. रस्ता असो... किंवा आणखी काही... केवळ तरुणच नाही, तर अनेक बुजूर्गही या अॅपच्या प्रेमात आहेत. मात्र टिकटॉकचा अतीवापर धोकादायक ठरू शकतो. तुमची व्यक्तिगत माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचू शकते. इस्त्रायलच्या चेक पॉइंट या सायबर सिक्युरिटी कंपनीच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे.

टिकटॉक अॅपमध्ये एक असा व्हायरस आहे, ज्यामुळे यूजर्सची व्यक्तिगत माहिती फुटू शकते. युजर्सचा प्रायव्हेट डेटावर हॅकर्सची नजर आहे. या व्हायरसच्या माध्यमातून हॅकर्स युजरला मॅलेशियस लिंक पाठवू शकतात. या लिंकवर क्लिक केल्यास यूजरचं अकाऊंट हॅक होतं. त्यानंतर युजरच्या अकाऊंटमधून हॅकर कोणताही व्हीडिओ अपलोड करू शकतो. एवढंच नव्हे, तर युजरचे प्रायव्हेट व्हिडिओ, फोटो आणि अन्य माहितीवरही डल्ला पडू शकतो. या अहवालानंतर टिकटॉकनं हा बग फिक्स केलाय खरा, मात्र चिंतेची बाब वेगळीच आहे. 

जगभरात टिकटॉकचे ७५ कोटी यूजर्स आहेत. जगातल्या १५५ देशांमध्ये टिकटॉक वापरलं जातं. भारतात २० ते २५ कोटी यूजर्स आहेत. चीनमध्ये १५ कोटी अॅक्टिव्ह यूजर्स आहेत. अमेरिकेतही सुमारे १.३२ कोटी लोक टिकटॉक वापरतात. १६ ते २४ वयोगटातील ४१ टक्के यूजर्स आहेत. ५५ टक्के पुरूष आणि ४५ टक्के महिला टिकटॉकवर अॅक्टिव्ह आहेत. ९० टक्के युजर्स रोज एकदातरी हे अॅप वापरतात.. तर प्रत्येकजण रोज सरासरी ५२ मिनिटं या अॅपवर असतो. दररोज १०० कोटी व्हीडिओ टिकटॉकवर बघितले जातात.

आता एवढं युजर्स असल्यामुळे या अॅपवर हॅकर्सचा डोळा असतो. आताचा बग फिक्स केला असला तरी यापूर्वीही असे प्रकार घडलेत. टिकटॉकसह फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम एवढंच काय तर गुगलसह अन्य अॅप्सचा डेटा चोरीला गेलाय. आपण कंपन्यांवर विश्वास ठेवून आपली खासगी माहिती शेअर करतो. या कंपन्या मात्र पुरेशी सुरक्षा बाळगत नाहीत. दुसऱ्या कुणीतरी असे बग का शोधून द्यावे लागतात. कंपन्यांनी स्वतःच याची काळजी घेतली तर आपला डेटा अधिक सुरक्षित राहील.