Persian Breed Cat: लोकांचा आपल्या पाळीव प्राण्यांवर खूप जीव असतो. एखाद्या घरातील व्यक्तीप्रमाणे ते पाळीव प्राण्यांना जपतात, त्यांची काळजी घेतात. अशावेळी त्यांना काही झाल्यास, ते हरवल्यास लोक काहीही करायला तयार असतात. असाच एक प्रकार समोर आलाय. ज्यात हरवलेले मांजर शोधून देणाऱ्यास 1 लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. 1 लाख इतकी रक्कम तर अनेकांना काही महिने काम करुनही मिळत नाही. त्यामुळे या मांजराला शोधण्यासाठी जनता आतुर झाली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
नोएडा येथील सेक्टर-62 येथील अपार्टमेंटमधून 15 दिवसांपूर्वी मांजर बेपत्ता झाले आहे. तेव्हापासून घरचे दु:खात आहेत. बेपत्ता झालेल्या दीड वर्षाच्या पाळीव मांजराचा शोध लावणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भात सेक्टर-62 मधील टॉट मॉलसह आसपासच्या परिसरात पोस्टर चिकटवण्यात आले आहेत. लोकांना पॅम्प्लेट वाटले जात आहेत.
हे मांजर पर्शियन जातीचे असून त्याचे नाव चिकू असे आहे. मांजराचा मालक पर्शियन जातीच्या मांजराचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान संपूर्ण परिसरात लावलेले पोस्टर्स चर्चेत आहेत. पोस्टरवरील क्रमांक देऊन संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळी उशिरा पोस्टर लावण्यात आले. सेक्टर-६२ येथील हार्मनी अपार्टमेंटमध्ये राहणारे अजय कुमार यांचे ते मांजर आहे. त्यांच्या दीड वर्षाच्या मांजरीचे नाव चिकू आहे. एका खास मित्राने त्यांना हे गिफ्ट केले होते. चिकू हा हलक्या तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचा आहे.
पर्शियन जातीच्या मांजरीचा स्वभाव सामान्यतः शांत असतो. चिकूदेखील अजय कुमार यांच्या कुटुंबातील सदस्यासारखा होता. त्याच्यावर पती-पत्नी दोघांचेही खूप प्रेम होते. सेक्टर-62 मधील त्यांच्या सोसायटीत त्यांनी त्याचा खूप शोध घेतला. जेव्हा तो सापडला नाही तेव्हा त्याचे फोटो सोशल मीडिया ग्रुपमध्ये त्यांनी शेअर केले . त्यानंतरही चिकू कुठेही न सापडल्याने त्यांनी पोलिसांत चिकू हरवल्याची तक्रार दाखल केली.
अद्यापपर्यंत त्यांना चिकूबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. चिकू परत यावा म्हणून अजय कुमार यांनी सेक्टर-62 मध्ये अनेक ठिकाणी चिकू मांजराचा फोटो आणि मोबाईल क्रमांक लिहिलेले फ्लायर्स चिकटवले आहेत. हे फोटो सोशल मीडियात चर्चेचा विषय बनले आहेत. आम्ही काम धंदा सोडून चिकूलो शोधू कारण आमचा वर्षभराचा पगार सुटेल अशी कमेंट काही युजर्स करताहेत. तर काही युजर्स इतक्या किंमतीची मांजर बाहेर सोडायचीच कशाला? असा प्रश्न उपस्थित करत आहेत.