मुंबई : अजून देशावरून कोरोनाचा धोका टळलेला नाही. अशातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यामध्ये हैदराबादमध्ये एक असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे सगळ्यांच्याच चिंतेत भर पडणार आहे. कोरोनातू बरं झालेल्या रूग्णाच्या मेंदूत व्हाईट फंगस एस्परगिलस (Aspergillus) असल्याचं समोर आलंय.
हैदराबादच्या सनशाईन हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ. पी. रंगनाथम यांनी सांगितले की, 'या रुग्णाला गेल्या मे महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. आजारपणाच्या वेळी त्याला फुफ्फुसाचा तीव्र संसर्ग झाला होता आणि त्याला बोलण्यातही अडचण येत होती.
या रूग्णाचं शरीर स्कॅन करण्यात आलं, ज्यामध्ये असं आढळूलं की रुग्णाच्या मेंदूमध्ये गुठळ्या सारख्या रचना तयार झाल्या आहेत. सतत उपचार करूनही या गुठळ्या बऱ्या होत नव्हत्या. म्हणून आम्ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मग कळलं की पांढऱ्या बुरशीने एक फोड तयार केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉ रंगनाथम यांनी सांगितले की, 'हे अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये घडतं. अशी प्रकरणं भारतात फार क्वचितच आढळली आहेत. हे एक अनोखं प्रकरण आहे. साधारणपणे, बुरशीजन्य संसर्ग मधुमेही रुग्ण किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या रुग्णांना पटकन पकडतो.
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर ब्लॅक फंगसचे रुग्ण अचानक वाढताना दिसले. विशेषत: महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्याच्या रुग्णांची संख्या खूप जास्त होती. यानंतर विषाणूची अनेक रूपं देखील दिसू लागली. परंतु आता शास्त्रज्ज्ञ देखील रुग्णाच्या मनात व्हाईट फंगसचा फोड समोर आल्यामुळे आश्चर्यचकित झालेत.
डॉक्टरांचे म्हणणं आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यामुळे ब्लॅक फंगस आणि नंतर व्हाईड बुरशीचं प्रमाणही कमी झालं. पण धोका अजूनही टळलेला नाही. कोरोना लोकांच्या आरोग्यावर नवीन प्रकारे परिणाम करत आहे. त्यामुळे कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत रहा.