ईदसाठी जम्मू- काश्मीरच्या जनतेने उचललं महत्त्वाचं पाऊल

अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर....  

Updated: Aug 11, 2019, 10:00 AM IST
ईदसाठी जम्मू- काश्मीरच्या जनतेने उचललं महत्त्वाचं पाऊल  title=
छाया सौजन्य- एएनआय

मुंबई : केंद्र सरकारडून जम्मू- काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेलं अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर साऱ्या देशात याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत होतं. त्याच धर्तीवर साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे सर्धाधिक प्रभावित अशा जम्मू आणि काश्मीर या भागावर. तणावाच्या याच वातावरणाला दूर सारत आता अनुच्छेद ३७० रद्द झाल्याचा स्वीकार करत पुन्हा एकदा या भागातील जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. 

कलम १४४सुद्धा हटवण्यात आल्यामुळे सांबा, कठुआ, रियासी, रामबन आणि उधमपूर या भागांतील परिस्थिती पूर्ववत होत आहे. सोमवारी असणाऱ्या #EidAlAdha ईदच्या निमित्ताने पुन्हा एकदा या परिसरात असणाऱ्या स्थानिक बाजारपेठा खुलल्या आहेत. व्यापाराच्या निमित्ताने नागरिक पुढे आले असून, दैनंदिन व्यवहारांवर ते लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काश्मीर खोऱ्यातील निर्बंधही लवकरच हटवण्यात येणार आहेत. 

यंदाच्या वर्षी काश्मीर खोऱ्यात स्वातंत्र्याची ईद साजरा करण्यात येईल. सर्व जनता ईदच्या तयारीला लागली आहे आणि सर्वांनीच निडरपणे ईद सादरा करावी, अशी प्रतिक्रिया राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली. कोणत्याही अडथळ्यांशिवाय जम्मू- काश्मीर भागात ईद पार पडावी असाच प्रशासकीय यंत्रणांचा मानस आहे, ज्याला सध्याच्या घडीला नागरिकांचीही साथ मिळताना दिसत आहे. 

दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे शनिवारी अनंतनाग येथे पोहोचले. ज्या ठिकाणी त्यांनी शालेय मुलांची भेट घेतली. त्यामुळे सध्याच्या घडीला राजकीय पटलावर होणाऱ्या हालचाली आणि जम्मू- काश्मीरची एकंदर परिस्थिती पाहता तेथे घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर साऱ्या देशाचं लक्ष आहे, हेच स्पष्ट होत आहे.