You Tube RecipeVideo : एखादी कठिणातील कठीण रेसिपी असो किंवा मग सोप्यातील सोपा पदार्थ. हल्ली युट्यूब अनेकांसाठीच एखाद्या शिकवणी वर्गाहून कमी नाही. एक असा शिकवणी वर्ग, जिथं जगाच्या टोकावर कोणतंही कौशल्य तुम्हाला पाहून शिकता येतं. व्हिडीओ स्वरुपात युट्यूबवर बहुविध प्रकारची माहिती उपलब्ध असून, मागील काही वर्षांमध्ये या माहितीचं स्वरुप आणि ती माहिती घेण्यासाठीचा Target Audience सुद्धा बदलल्याचं पाहायला मिळालं आहे.
युट्यूबवर हे बदल होत असतानाच सातत्यानं पसंती मिळणारे व्हिडी ओ ठरले ते म्हणजे पाककलांचे. विविध प्रांतांच्या, विविध देशांच्या खाद्यसंस्कृतींमध्ये डोकावण्यास भाग पाहणाऱ्या या पाककलांच्या व्हिडीओंची युट्यूबवर कमाल चलती पाहता येते. अशा या माध्यमावर नुकताच काहीसा खळबळजनक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला.
सदर प्रकार तेलंगणातील असल्याची माहिती समोर येत असून येथील एका युट्यूबरनं मोराचा रस्सा अर्थात Pecock Curry बनवण्याचा एक व्हिडीओ शेअर केला, ज्यानंतर पोलिसही चक्रावले. प्राथमिक माहितीनुसार सिरसिला जिल्ह्यातील प्रणय कुमार यांच्याविरोधात याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून, 'तो' व्हिडीओसुद्धा हटवण्यात आला आहे.
कोडम प्रणय कुमार असं या युट्यूबरचं नाव असून, त्यानं Traditional Pecock Curry चा व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता. दरम्यान, हा सर्व प्रकार पाहून वन्यजीव संरक्षक संघटनांनी या युट्यूबवर संपात व्यक्त केला असून, त्याचा व्हिडीओ हटवलेला असतानाही आता त्याच्यावर आणखी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार आरोपीनं असा एखादा व्हिडीओ शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा त्यानं जंगली डुकराची शिकार करत त्यापासून तयार करण्यात आलेल्या एका पदार्थाचा व्हिडीओ शेअर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिरसिलाचे एसपी अखिल महाजन यांच्या माहितीनुसार प्रणय कुमारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अशी कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा थेट इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रणय कुमार फरार झाला होता. ज्यानंतर पोलिसांनी तातडीनं त्याचा शोध घेण्यासाठी सूत्र हलवली आणि अखेर काही तासांच्या शोधमोहिमेनंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. आरोपीनं जिथं हा व्हिडीओ चित्रीत केला त्या ठिकाणाचा आढावाही पोलिसांनी घेतला.
वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत मोराची गणना अनुसूची 1 अंतर्गत केली जात असून, मोराला मारणं हा एक दंडनीय अपराध असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्याप्रकरणी किमान 3 वर्षांचा कारावास आणि कमाल 7 वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. प्रणय कुमारआधीही असंच एक प्रकरण समोर आलं होतं जिथं, तेलंगणातूनच विकाराबाद जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना मोराच्या मांसासह ताब्यात घेण्यात आलं होतं. शेतात मोरपंख पाहून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्या घटनेची कुणकूण लागली होती. ज्यानंतर वीजेच्या धक्क्यामुळं मारल्या गेलेल्या मोरांची करी बनवल्याची माहिती त्या शेतकऱ्यांनी पोलिसांना दिली होती. दरम्यान सध्या समोर आलेल्या प्रकरणामुळं प्राणीमित्र संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.