बोट घालून काढले डोळे, केले दुर्गादेवीला अर्पण; कुटुंबियांसमोरच केले कृत्य

बिहारमधील दरभंगा येथे ही घटना घडली. जखमी मुलीला दरभंगा येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 25, 2018, 05:53 PM IST
बोट घालून काढले डोळे, केले दुर्गादेवीला अर्पण; कुटुंबियांसमोरच केले कृत्य title=

पाटना : एका १६ वर्षीय मुलीने चक्क स्वत:च्या डोळ्यात बोटं घालून डोळे काढले आणि ते चक्क दुर्गादेवीला अर्पण केले. अंधभक्तीच्या या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. बिहारमधील दरभंगा येथे ही घटना घडली. जखमी मुलीला दरभंगा येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कुटूंबियांसमोरच काढले डोळे

पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, दरभंगा येथील बहेरी ब्लॉक येथील सूरूआ गावात हा प्रकार घडला. कोमल कुमारी असे हे कृत्य करणाऱ्या मुलीचे नाव असून, आपल्या परिवारासोबत ती चैत्र नवरात्री सप्ताहनिमित्त पुजेसाठी दुर्गा मंदिरात गेली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने आपल्या हाताची बोटे स्वत:च्या डोळ्यात घातली आणि डोळे बाहेर काढले. बाहेर काढलेले डोळे तिने दुर्गामातेला अर्पण केले.

'त्या' मुलीवर रूग्णालयात उपचार सुरू

या धक्कादायक प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच घबराट आणि खळबळ उडाली. मुलीला बहेरी येथील हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर दरबंगा येथील मेडिकल कॉलेज (डीएमसीएच) येथे दाखल करण्यास सांगितले. डीएमसीएचचे प्रमुख संतोष कुमार मिश्र यांनीही ही घटना धक्कादायक आणि तितकीच खतरनाक असल्याचे म्हटले आहे.

नकारार्थी उत्तर येताच काढले डोळे

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती अशी की, मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांना त्या मुलीने (कोमल कुमारी) या आधी कोणी दुर्गामातेला आपले डोळे अर्पण केले आहेत का असे विचारले? तिच्या या प्रश्नावर बहुतांश उपस्थितांनी नकार्थीच मान डोलावली. दरम्यान, काही क्षणांतच मुलीने हे कृत्य करत डोळे देवीला अर्पण केले. पटनाच्या महावीर मंदिराचे पुजारी भवनाथ झा यांनी म्हटले की, कोणत्याही प्रकारे या मुलीच्या कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही. बहुदा ती  मानसीक रूग्ण असावी.