पासपोर्ट अधिकाऱ्याचा दाम्पत्याच्या आंतरधर्मीय विवाहाला आक्षेप, अर्ज केला रद्द

मोहम्मद अनस सिद्दीकी आणि त्यांची पत्नी तन्वी सेठ यांनी लखनऊच्या पासपोर्ट सेवा केंद्रात पासपोर्टसाठी अर्ज केला होता

Updated: Jun 21, 2018, 08:42 AM IST
पासपोर्ट अधिकाऱ्याचा दाम्पत्याच्या आंतरधर्मीय विवाहाला आक्षेप, अर्ज केला रद्द   title=

लखनऊ : आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या एका दाम्पत्याला पासपोर्ट काढण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागलंय. हिंदू पत्नी आणि मुस्लिम पती असलेल्या या दाम्पत्यालाचा पोसपोर्टसाठीचा अर्ज पासपोर्ट अधिकाऱ्यानं फेटाळून लावला. इतकंच नाही तर पतीला हिंदू धर्म स्वीकारण्याचा आणि सात फेरे घेऊन विवाह करण्याचा अवांछिक सल्लाही अधिकाऱ्यानं या दाम्पत्याला दिला. उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये ही घटना उघडकीस आलीय. या दाम्पत्यानं केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि पीएमओला ट्विट करत या घटनेची माहिती देत यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केलीय. 

मोहम्मद अनस सिद्दीकी आणि त्यांची पत्नी तन्वी सेठ यांनी लखनऊच्या पासपोर्ट सेवा केंद्रात पासपोर्टसाठी अर्ज केला होता. मोहम्मद आणि तन्वी हे दोघे २००७ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांना सहा वर्षांची एक मुलगीही आहे. हे दाम्पत्य नोएडातील एका खाजगी कंपनीत काम करतात. 

दाम्पत्य जेव्हा पासपोर्ट केंद्रातील काऊंटरला सी गेले तेव्हा विकास मिश्रा नावाच्या एका अधिकाऱ्यानं तन्वीला पहिल्यांदा बोलावलं. त्यानं तन्वीला तिचं नाव बदलण्याचा सल्ला दिला अन्यथा तिचा अर्ज बाद होईल, असंही सांगितलं. जेव्हा तन्वीनं याला नकार दिला तेव्हा अधिकाऱ्यानं सर्वांदेखत तिला फैलावर घेतलं. यामुळे तन्वीला रडू कोसळलं. त्यानंतर अधिकाऱ्यानं तिला दुसऱ्या एका अधिकाऱ्याची भेट घेण्यास सांगितलं. 

त्यानंतर मिश्रा यांनी मोहम्मद सिद्दीकी यांना बोलावलं... आणि त्यांच्याशी अर्वाच्च भाषेत हिंदू धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला. हिंदू धर्म स्वीकारला नाही तर तुमचा विवाह अमान्य केला जाईल... हिंदू रितीरिवाजानुसार, सात फेऱ्यांसोबत लग्न केलं तरच ते मान्य असेल, अशी बतावणीही या अधिकाऱ्यानं केली. 

या घटनेनं दाम्पत्याला धक्का बसलाय. मोहम्मद सिद्दीकी आणि तन्वीच्या म्हणण्यानुसार, तिला कधीही तिचं नाव बदलण्याची गरज वाटली नाही... आणि पासपोर्टसाठी विवाहीत महिलांना नाव बदलण्याचीही गरज नाही... मग एखादा सरकारी अधिकारी यासाठी सक्ती करत आपला अर्ज कसा काय नाकारू शकतो, असा प्रश्न या दाम्पत्याला पडलाय. त्यांनी सोशल मीडियावरून सुषमा स्वराज आणि पीएमओला यांना या घटनेत हस्तक्षेप करण्याची मागणी केलीय.