Cough syrup: कफ सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनेची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) कडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने कार्यवाही सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतात बनवलेल्या 7 कफ सिरपला ब्लॅक लिस्टेड करण्यात आले आहे. अनेक देशांमध्ये कफ सिरपमुळे 300 हून अधिक मृत्यू झाल्यानंतर WHO ने ही कारवाई केली आहे. गेल्या काही महिन्यांत नायजेरिया, गाम्बिया आणि उझबेकिस्तानमध्ये अनेक मृत्यूंची नोंद झाली आहे ज्यांचा संबंध कफ सिरप पिण्याशी संबंधित आहे.
भारत आणि इंडोनेशियामधील फार्मा कंपन्यांनी तयार केलेल्या 20 हून अधिक कफ सिरपची चाचणी घेण्यात आली आहे. तपासणीनंतर डब्ल्यूएचओने भारतात बनवलेल्या या कफ सिरपबाबत अलर्टही जारी केल्याचे डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्याने सांगितले.
हे कफ सिरप गाम्बिया आणि उझबेकिस्तानमध्ये झालेल्या मृत्यूंनंतर वादात सापडले आहेत. या घटनांमध्ये कफ सिरप प्यायल्यामुळे 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यापूर्वी, भारताच्या औषध नियंत्रकाने नोएडाच्या मेरियन बायोटेक, चेन्नईची ग्लोबल फार्मा, पंजाबची क्यूपी फार्माकेम आणि हरियाणाची मेडेन फार्मास्युटिकल्ससह इतर अनेक फार्मा कंपन्यांचीही तपासणी केली होती. या तपासणीत काही अनियमितता आढळून आल्याने औषध नियंत्रकाने या कंपन्यांच्या कामकाजावर बंदी घातली. औषधे निर्यात करण्यापूर्वी त्यांच्या गुणवत्ता नियंत्रणाची खात्री केली जाईल, असे सीडीएससीओच्या सूत्रांनी सांगितले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकारचे कफ सिरप 9 देशांमध्ये विकले गेले आहेत. असे कफ सिरप पुढील काही वर्षे अनेक देशांमध्ये मिळत राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यात सापडलेल्या कफ सिरप आणि प्रोपीलीन ग्लायकोलचे शेल्फ लाइफ सुमारे दोन वर्षे आहे. यामुळेच WHO देखील याला मोठा धोका मानत आहे.