मुंबई : Parenting Tips : आपण सर्वजण आपल्या मुलांना इतर मुलांपेक्षा चांगले बनवण्यासाठी स्पर्धा करीत असतो. कधी डान्सिंग क्लासमध्ये, कधी गाण्याच्या क्लासमध्ये, कधी कराटेच्या क्लासमध्ये तर कधी इतर कोणत्यातरी ऍक्टिव्हिटीमध्ये व्यस्त ठेवतात. पण तुमच्या मुलाला काय हवे आहे, त्यांना काय आवडते आणि काय नाही हे तुम्हाला माहीत आहे का?
तुम्ही त्यांना जबरदस्ती करताय का? त्यांना नको असलेल्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेण्यास दबाव आणताय का? परंतू तुमचा हा दबाव त्यांच्या मनावर दडपण आणतो. जे तुम्हाला समजत नाही, पण ते वेळीच समजून घेणे गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला मोठ्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
मुलांनी लहानपणी गाणी म्हणणे डान्स करणे किंवा इतर गोंडस ऍक्टिव्हिटी करणे प्रत्येक पालकांना आवडते. परंतू म्हणून तुम्ही त्यांना इतर लोकांसमोर प्रदर्शन करण्यासाठी दबाव आणू नका. मुलांची इच्छा नसेल तर त्यांना पाहुण्यांसमोर कौशल्य दाखवण्यासाठी जबरदस्ती करू नका. त्यामुळे त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
पालक नेहमीच आपल्या मुलांना शिक्षण आणि इतर ऍक्टिव्हिटीमध्ये पहिले येण्यासाठी दबाव टाकत असतात. एवढेच नाही तर सातत्याने दुसऱ्या मुलांशी तुलना करीत असतात. परंतू तुम्ही प्रत्येक व्यक्ती आपल्या बुद्धिमत्तेनुसार काम करीत असतो. त्यांच्यावर दबाव टाकणं योग्य नाही. हे समजून घेतलं पाहिजे.
मुलांना जिंकण्याची सवय लावण्यापेक्षा अपयशाशी कसे डील करावे, हे शिकवायला हवे. यामुळे मुलं सकारात्मक विचार करू शकतील. त्यांना इतरांच्या यशामुळे ईर्शा होणार नाही.
प्रत्येकजण सर्वच कामात परफेक्ट असतील असं नाही.मुलांना सर्वच ठिकाणी अव्वल राहण्यासाठी दबाव टाकल्याने त्यांचे लहानपण हिरावून घेऊ नका. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीत परफेक्ट होण्यापेक्षा मुलांना प्रामाणिक आणि चांगली व्यक्ती होण्यासाठी प्रेरित करा.