सीमा हैदर आता थेट 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार? राष्ट्रीय पक्षाने दिली ऑफर

पाकिस्तानच्या सीमा हैदरला भारतात येऊन आता एक महिन्याहून अधिक कालावधी झालाय. पण तिच्याबाबतच्या चर्चा काही थांबताना दिसत नाहीएत. सीमा हैदरचा पाकिस्तानातून भारतात येण्यामागे काही कट कारस्थान तर नाही ना याची चौकशी केली जात आहे. त्यातच आता तिला थेट लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे.

राजीव कासले | Updated: Aug 3, 2023, 05:16 PM IST
सीमा हैदर आता थेट 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार?  राष्ट्रीय पक्षाने दिली ऑफर title=

Seema Haider : भारतातल्या सचिन मीणावरच्या प्रेमापोटी पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत (Seema Haider) दररोज नवनवे खुलासे होत आहेत. सीमा हैदर लवकरच बॉलीवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री करणार असून एक चित्रपटही तीने साईन केल्याची चर्चा आहे. याशिवाय गुजरातमधल्या एका बड्या उद्योगपतीने सीमा आणि सचिनला वार्षिक सहा लाखांच्या पगाराची नोकरी ऑफर केली आहे. हे कमी की काय आता सीमा हैदर चक्क 2024 लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) लढवण्याची शक्यता आहे. एका राष्ट्रीय पक्षाने सीमा हैदरला आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे लवकरच सीमा हैदरचा राजकारणात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

एनडीएत मित्र पक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (Republican Party Of India) सीम हैदरला पक्षप्रवेशाचा प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा हैदरने RPI चं निमंत्रण स्विकारलं आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा हैदरला पक्षाच्या महिला विंगचं अध्यक्ष केलं जाणार आहे. तिच्या बिनधास्त आणि थेट बोलण्याच्या पद्धतीमुळे तिला प्रवक्तेपदही दिलं जाण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या चिन्हावर सीमाला लोकसभा निवडणुकीत तिकटही दिलं जाणार आहे. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मासूम किशोर यांनी याबाबत माहिती दिली आहे. सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली आहे. भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी सीमाला क्लिन चीट दिल्यास आणि तिला भारतीय नागरिकता मिळाल्यास तिचं पक्षात स्वागत आहे, असं मासूम किशोर यांनी सांगितलं. भारताचा नागरिक असलेल्या प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सीमाच्या आतापर्यंतच्या तपासात तिच्यावर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. सुरक्षा यंत्रणांची क्लीन चिट मिळाल्यास सीमाला प्रवक्तेपद देण्यात येईल, कारण ती एक चांगली वक्ता आहे, असंही मासून किशोर यांनी म्हटलंय.
 
सीमाला बॉलिवूडचा ऑफर

दरम्यान, सीमाला बॉलिवूड चित्रपटाचीही ऑफर आली आहे. उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा इथल्या जानी फारयफॉक्सच्या टीमने बुधवारी सीमाची तिच्या राहात्या घरी जाऊन भेट घेतली.  आगामी चित्रपट 'अ टेलर मर्डर स्टोरी' चित्रपटासाठी सीमीाचं ऑडिशन घेण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार सीमाने चित्रपटाची ऑफर स्विकारली आहे. या चित्रपटात सीमा रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट राजस्थानच्या उदयपूर इथल्या कन्हैयालाल या टेलरच्या हत्येवर आधारित असणार आहे. कन्हैय्यालाल यांची त्यांच्याच दुकानात दहशतवाद्यांनी निर्घृणपणे हत्या केली होती.