पाकिस्तान भारताविरुद्ध वेगळं युद्ध करण्याच्या तयारीत

आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेनं भारताच्या विरोधात नवा कट रचलाय...

Updated: Aug 16, 2017, 10:38 PM IST
पाकिस्तान भारताविरुद्ध वेगळं युद्ध करण्याच्या तयारीत  title=

मुंबई : आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेनं भारताच्या विरोधात नवा कट रचलाय.भारतावर हल्ला करण्यासाठी त्यांनी नवी व्यूहरचना आखलीय. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या ताज्या अलर्टनुसार, भारतावर सायबर हल्ला करण्याची तयारी पाकिस्ताननं चालवलीय. भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदलाच्या संगणकांना लक्ष्य करण्याचा कुटील डाव पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संघटनेनं आखलाय. ही माहिती हाती आल्यानंतर सर्व लष्करी सुरक्षा यंत्रणांना सावधगिरी बाळगण्याची सूचना देण्यात आलीय. तिन्ही दलांच्या वरिष्ठ अधिका-यांनी यासंदर्भात योग्य ती पावलं उचलण्याचे आदेश आयटी खात्याला दिलेत.

एकीकडं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तान बेछूट गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन करतंय. तर दुसरीकडं भारतासोबत सायबर युद्ध करण्याचे डावपेच पाकिस्ताननं आखलेत. त्यासाठी काही निवडक हॅकर्सना आर्थिक रसद पुरवली जातेय. पाकिस्तानला ईंट का जवाब पत्थरसे देण्यासाठी ब्लॅक हॅट हॅकर्स नावाची भारतीय हॅकर्सची टीमही मैदानात उतरलीय. पाकिस्तानच्या 100 हून अधिक वेबसाइट्ना लक्ष्य करण्यात भारतीय हॅकर्स यशस्वी ठरलेत.

अलिकडेच वान्नाक्राय आणि पेटया या नावानं दोन सायबर खंडणीवसुलीचे प्रकार जगानं पाहिले. भारतासह जगभरातल्या अनेक खासगी कंपन्यांना या व्हायरसनं आपलं शिकार बनवून मोठी आर्थिक खंडणी वसुली केली. या दोन्ही सायबर हल्ल्यांमागं आयएसआयचा हात होता, असा सूत्रांचा दावा आहे. आता यालाच मुँहतोड जवाब देण्याच्या हालचाली भारतीय हॅकर्सनी चालवल्यात.

पाकिस्तान या ना त्या माध्यमातून कुरापती काढतंय. आता त्यांच्या प्रत्येक कारवाईला जशास तसं उत्तर देण्याची तयारी भारतानं केलीय त्यामुळं सायबर युद्धातही पाकिस्तानला धूळ चारण्यात भारत यशस्वी ठरेल, असा विश्वास आहे.